Share Market News in Marathi : व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये आज सकाळी २ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. कंपनीच्या संचालक मंडळानं सोमवारी घेतलेल्या एका निर्णयामुळं शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं १९८० कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास सोमवारी मंजुरी देण्यात आली.
बीएसईवर व्होडाफोन आयडियाचे शेअर्स आज ८.२५ रुपयांच्या पातळीवर उघडले. काही काळानंतर ही किंमत ८.२९ रुपयांच्या पातळीवर पोहोचली. मात्र, त्यानंतर शेअर्समध्ये घसरण होऊन ते ८.०९ रुपयांपर्यंत खाली आले.
व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळानं घेतलेल्या निर्णयाची माहिती शेअर बाजाराला देण्यात आली आहे. त्यानुसार, १० रुपयांच्या अंकित मूल्याचे १,७५५,३१९,१४८ इक्विटी शेअर्स १.२८ रुपये प्रति शेअरच्या इक्विटी प्रीमियमसह ११.२८ रुपये प्रति शेअर इश्यू प्राइसवर जारी करण्यास मान्यता देण्यात आली. ओमेगा टेलिकॉम होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड (१,२८० कोटी रुपयांपर्यंत) आणि उषा मार्टिन टेलिमॅटिक्स लिमिटेड (७०० कोटी रुपयांपर्यंत) या व्होडाफोन समूहाच्या संस्था आणि प्रवर्तकांना एकूण १,९८० कोटी रुपयांचे समभाग देण्यात येणार आहेत. प्रेफरेंशियल इश्यूची किमान किंमत निश्चित करण्याची तारीख ६ डिसेंबर २०२४ आहे. या निर्णयाला मंजुरी देण्यासाठी ७ जानेवारी २०२५ रोजी कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे.
व्होडाफोन आयडियाच्या शेअर्ससाठी गेले एक वर्ष चांगलं गेलं नाही. या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किमती तब्बल ३७ टक्क्यांनी घसरल्या आहेत. तर २०२४ मध्ये कंपनीची कामगिरी खराब झाली आहे. या वर्षी हा शेअर ५२ टक्क्यांनी घसरला आहे. व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये गेल्या ५ वर्षांत केवळ २३ टक्के वाढ झाली आहे. त्यापेक्षा जास्त परतावा बीएसई सेन्सेक्सनं दिला आहे. बीएसई निर्देशांकानं १०२ टक्के परतावा दिला आहे.
संबंधित बातम्या