मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vi आणि एलन मस्कचा काय संबंध? शेअर विकून का पळाले गुंतवणूकदार?

Vi आणि एलन मस्कचा काय संबंध? शेअर विकून का पळाले गुंतवणूकदार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 02, 2024 08:02 PM IST

Vi on tie up with Starlink : दूरसंचार क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असलेल्या वोडाफोन आयडियाचा शेअर आज एका दिवसात साडेपाच टक्क्यांहून अधिक घसरला.

Vi Share Price
Vi Share Price

Vodafone Idea Share Price : कर्जात बुडालेल्या व त्यातून बाहेर पडण्याची शिकस्त करणाऱ्या वोडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीला आज आणखी झटका बसला. कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली. दिवसभरात कंपनीचे शेअर्स ५.५९ टक्क्यांनी घसरले. एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीशी संभाव्य डीलबाबत करण्यात आलेला खुलासा यासाठी कारण ठरला.

काही वर्षांपूर्वी भारतात आघाडीवर असलेल्या वोडाफोन आयडियाचे दिवस पुरते फिरले आहेत. कंपनी सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली असून त्यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग दिसत नाहीए. त्यातच प्रख्यात उद्योजक एलॉन मस्क यांची स्टारलिंक ही कंपनी व्हीआयसोबत टाय-अप करणार असल्याची बातमी आली. त्यामुळं मागच्या पाच दिवसांत व्हीआयचा शेअर चांगलाच वधारला. मात्र, स्टारलिंकशी कुठलीही बोलणी सुरू नसल्याचं कंपनीनं स्पष्ट केल्यानतंर आज हा फुगा फुटला. दिवसअखेर हा शेअर १६.०५ रुपयांवर बंद झाला.

Penny Stocks Explained : पेनी स्टॉक म्हणजे काय? त्यातील गुंतवणूक खरंच फायद्याची असते?

व्हीआयनं काय केला खुलासा?

व्होडाफोन आयडियामधील आपला ३३ टक्के हिस्सा केंद्र सरकार अब्जाधीश एलन मस्क यांच्या स्टारलिंकला विकू शकतेस अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याबाबत सेबीनं व्हीआयकडं विचारणा केली होती. त्यावर कंपनीनं स्पष्टीकरण दिलं. 'आमची कोणत्याही कंपनीशी बोलणी सुरू नाहीत, असं व्हीआयनं स्टॉक एक्स्चेंजला कळवलं.

भांडवलच मिळेना!

मोठ्या कर्जाच्या ओझ्याला तोंड देत असलेली कंपनी आदित्य बिर्ला ग्रुप आणि व्होडाफोन पीएलसी या प्रवर्तकांसह विविध स्त्रोतांकडून नवीन निधी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर विश्लेषकांशी बोलताना सीईओ अक्षय मुंद्रा यांनी कंपनीला प्रवर्तकांकडून निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. दोन्ही प्रवर्तकांनी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस निधी आणणं अपेक्षित होतं. मात्र, हे अद्याप प्रत्यक्षात आलेलं नाही.

IPO Explainer : आयपीओ म्हणजे काय? जाणून घ्या स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीचा भन्नाट पर्याय

कंपनीच्या शेअरची स्थिती

गेल्या पाच दिवसांत व्होडाफोन आयडियाचे शेअर्स १९.७८ टक्क्यांनी वाढले आहेत. तर, सहा महिन्यांत ११२.५८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या कालावधीत शेअरची किंमत ७.५५ रुपयांवरून १६.०५ पर्यंत आली आहे. हा शेअर वर्षभरात १०३ टक्क्यांनी वाढला आहे. २०१५ मध्ये या शेअरची किंमत ११८ रुपये होती.

WhatsApp channel

विभाग