Vivo Y18i launched in India: परवडणाऱ्या किमतीत चांगली बॅटरी आणि चांगला कॅमेरा असलेला चांगल्या दर्जाचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर विवो कंपनीचा विवो व्हाय १८ आय स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकतो. हा फोन नुकताच भारतीय स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
विवो व्हाय १८ आय हा स्मार्टफोन २३ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय बाजारात लॉन्च झाला. हा एक एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे जो आता भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन विवोच्या वाय-सीरिज रेंजचा एक भाग आहे आणि यात ५००० एमएएचची बॅटरी आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये प्लॅस्टिक फ्रेम आणि बॅकसोबत फ्रंटला ग्लास देण्यात आला आहे.
विवो वाय १८ आय मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.५६ इंचाचा आयपीएस एलसीएस डिस्प्ले आहे . हा स्मार्टफोन ७२० बाय १६१२ पिक्सल रिझोल्यूशन आणि ५२८ निट्स पीक ब्राइटनेससह येतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित विवोच्या फनटच १४ वर चालतो. यात युनिसॉक टी६१२ चिपसेट, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्ड इन्स्टॉल केल्यानंतर स्टोरेज वाढवता येते.
कॅमेऱ्याच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर पॉकेट-फ्रेंडली विवो वाय १८ आय मध्ये एफ/२.२ अपर्चरसह १३ एमपी मुख्य कॅमेरा आणि मागील बाजूस एफ/ ३.० अपर्चरसह आणखी ०.०८ एमपी कॅमेरा सेन्सर आहे. उच्च दर्जाचे फोटो क्लिक करण्यासाठी कॅमेऱ्यात एलईडी फ्लॅश आणि पॅनोरमा असे दोन मोड आहेत. युजर्स ३० फ्रेम प्रति सेकंद या दराने १०८० पिक्सेलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
विवो वाय १८ आय स्मार्टफोन वायफाय, ब्लूटूथ, हॉटस्पॉट आणि जीपीएस कनेक्टिव्हिटी पर्यायांशी सुसंगत आहे. हा स्मार्टफोन चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी २.० पोर्ट सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन धूळ तसेच आयपी५४ रेटिंगसह वॉटर रेझिस्टंट आहे.
विवो वाय १८ आय विविध ई-कॉमर्स साइट्स आणि विवोच्या स्वतःच्या वेबसाइटवर ७ हजार ९९९ रुपयांच्या किफायतशीर किंमतीत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन जेम ग्रीन आणि स्पेस ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. भारतभरातील रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.