Vivo X200 Series Sale: विवोने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये विवो एक्स २०० सीरिजचे स्मार्टफोन लॉन्च केले होते, जिथे फोनचा पहिला सेल आजपासून (१९ ऑक्टोबर) सुरू झाला. या स्मार्टफोन्सने बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. कंपनीने आज जाहीर केले की, एक्स २०० ने सर्व चॅनेल्सवर २ अब्ज युआन (म्हणजे सुमारे २ हजार ३६० कोटी) पेक्षा जास्त विक्री केली आहे. कंपनीच्या मागील सर्व पहिल्या दिवसाच्या सेलचा विक्रम आज मोडला आहे. हा आकडा आज विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या स्टँडर्ड एक्स २०० आणि हाय-एंड एक्स २०० प्रो या दोन मॉडेल्सच्या विक्रीसाठी आहे.
विवो एक्स २०० सीरिजमधील मिनी मॉडेल २५ ऑक्टोबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. विवो एक्स २०० आणि विवो एक्स २०० प्रोला मिळणारा प्रतिसाद पाहता विवो २०० एक्स प्रो मिनीलाही असेच यश मिळण्याची शक्यता आहे. विवो एक्स २०० सीरिजमध्ये विवो एक्स २००, एक्स २०० प्रो आणि एक्स २०० प्रो मिनी या तीन स्मार्टफोन मॉडेल्सचा समावेश आहे. लवकरच ते भारतातही लॉन्च केले जातील, असे सांगितले जात आहे.
विवो एक्स २०० सीरिजमध्ये सर्व मॉडेल्समध्ये अमोलेड डिस्प्ले आहे. एक्स २०० मध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले आहे, तर एक्स २०० प्रोमध्ये ६.७८ इंच आणि प्रो मिनीमध्ये ६.३१ इंचाचा डिस्प्ले आहे. प्रत्येक डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि ४५०० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. सर्वोत्तम अनुभवासाठी, प्रो आणि प्रो मिनी मॉडेल्स एलटीपीओ टेक्नोलॉजी वापर केला जात आहे.
तिन्ही मॉडेल्स मीडियाटेकच्या डायमेंसिटी ९४०० चिपसेटने सुसज्ज आहेत. विवो एक्स २०० सीरिजमध्ये १६ जीबी LPDDR5X रॅम आणि १ टीबी यूएफएस ४.० स्टोरेज आहे, तर एक्स २०० प्रो मध्ये १ टीबी व्हेरियंटमध्ये अॅडव्हान्स LPDDR5X अल्ट्रा प्रो रॅम पर्याय देण्यात आला आहे, जो सॅटेलाइट कम्युनिकेशनलाही सपोर्ट करतो.
विवो एक्स २०० सीरिजमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह ५० मेगापिक्सलचा सोनी एलवायटी-८१८ प्रायमरी कॅमेरा आणि ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. प्रो मॉडेलमध्ये २०० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स (३.७ एक्स झूम) तर एक्स २०० आणि प्रो मिनी मॉडेलमध्ये ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर (३एक्स झूम) देण्यात आला आहे. तिन्ही मॉडेल्समध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
विवो एक्स २०० सीरिजमधील तिन्ही फोनमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली आहे. एक्स २०० मध्ये ५८०० एमएएच ची बॅटरी, एक्स २०० प्रोमध्ये ६००० एमएएच ची बॅटरी आणि प्रो मिनीमध्ये ५७०० एमएएच ची बॅटरी आहे. फास्ट चार्जिंगसाठी प्रत्येक फोनमध्ये 90 वॉट वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट आहे, तर प्रो आणि प्रो मिनी मॉडेल्समध्ये 30 वॉट वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.
एक्स २०० प्रोची सुरुवातीची किंमत ५ हजार २९९ चीनी युआन (सुमारे ६२ हजार रुपये) आहे. एक्स २०० प्रो मिनीची सुरुवातीची किंमत ४ हजार ६९९ चीनी युआन (सुमारे ५५ हजार ७०० रुपये) आणि एक्स २०० ची सुरुवातीची किंमत ४ हजार ३०० चीनी युआन (सुमारे ५१ हजार रुपये) आहे. या किंमती तिन्ही फोनच्या १२ जीबी/२५६ जीबी मॉडेलसाठी आहेत.