Vivo V40e Specifications Leaked: स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो आपले व्ही ४० ई मॉडेल भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हे नवीन मॉडेल सध्याच्या विवो व्ही ४० सीरिजमध्ये सामील होईल, ज्यात विवो व्ही ४० प्रो आणि विवो व्ही ४० चा समावेश आहे. विवो व्ही ४० ई नेमके कधी लॉन्च होईल, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र, त्यापूर्वीच या फोनमध्ये मिळणारे फीचर्स लीक झाले आहेत. लीक झालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये नेमकी कोणती फीचर्स मिळण्याची शक्यता आहे, याबाबत जाणून घेऊयात.
लीक झालेल्या माहितीनुसार विवो व्ही ४० ई मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा एमोलेड डिस्प्ले मिळेल, जो व्ही ४० सीरिजमधील इतर मॉडेल्सच्या स्क्रीन आकाराशी जुळतो. डिव्हाइसमध्ये थ्रीडी कर्व्ड पॅनेल चा समावेश असेल आणि ४,५०० निट्सची पीक ब्राइटनेस मिळेल अशी अपेक्षा आहे. विवो व्ही ४० ई मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० चिपसेट असेल असा अंदाज आहे.
विवो आपले व्ही ४० ई स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी विवो व्ही ४० ई मध्ये ५० एमपी सोनी आयएमएक्स ८८२ मुख्य सेन्सर, ८ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ एमपी अतिरिक्त सेन्सर असण्याची शक्यता आहे. फ्रंट फेसिंग कॅमेरा ५० एमपी सॅमसंग जेएन १ सेन्सर असू शकतो.
विवो व्ही ४० ई मध्ये ५ हजार ५०० एमएएच बॅटरी मिळण्याची शक्यता आहे, जी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. याआधीच्या एका रिपोर्टमध्ये असेही सुचवले गेले होते की, हा फोन वॉटरप्रूफ असेल. पाण्यात पडल्यानंतरही या फोनला काही होणार नाही, असा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अधिकृत घोषणा झाली नाही. विवोच्या फनटच ओएस १४ स्किनसह अँड्रॉइड १४ वर चालण्याची शक्यता आहे.
स्मार्टप्रिक्सच्या रिपोर्टनुसार, विवो व्ही ४० ई मॉन्सून ग्रीन आणि रॉयल ब्रॉन्झ या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. फोनमध्ये ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी + २५६ जीबी असे दोन स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध असण्याची शक्यता आहे. भारतात विवो व्ही ४० ईची अपेक्षित किंमत २० हजार ते ३० हजार रुपयांच्या आसपास असते.