ग्रे मार्केटमध्ये गरजतोय विशाल मेगा मार्टचा आयपीओ; करू शकतो गुंतवणूकदारांना मालामाल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ग्रे मार्केटमध्ये गरजतोय विशाल मेगा मार्टचा आयपीओ; करू शकतो गुंतवणूकदारांना मालामाल

ग्रे मार्केटमध्ये गरजतोय विशाल मेगा मार्टचा आयपीओ; करू शकतो गुंतवणूकदारांना मालामाल

Dec 17, 2024 01:21 PM IST

Vishal Mega Mart IPO GMP : विशाल मेगा मार्टचा बहुचर्चित आयपीओ उद्या शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. हा शेअर ग्रे मार्केटमध्ये २५% प्रीमियवर असल्यानं गुंतवणूकदारांना प्रचंड अपेक्षा आहेत.

ग्रे मार्केटमध्ये गरजतोय विशाल मेगा मार्टचा आयपीओ; करू शकतो गुंतवणूकदारांना मालामाल
ग्रे मार्केटमध्ये गरजतोय विशाल मेगा मार्टचा आयपीओ; करू शकतो गुंतवणूकदारांना मालामाल

IPO News Marathi : विशाल मेगा मार्टचे शेअर्स बुधवारी, १८ डिसेंबर रोजी बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. लिस्टिंगच्या आधीच कंपनीच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम २५ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. त्यामुळं जोरदार लिस्टिंगची अपेक्षा आहे.

विशाल मेगा मार्टचा आयपीओ ११ डिसेंबर २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि १३ डिसेंबरपर्यंत खुला राहिला. कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण ८,००० कोटी रुपये उभारणार आहे.आयपीओमध्ये शेअरची किंमत ७८ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) २०.५० रुपयांवर पोहोचला आहे. सध्याच्या जीएमपीवर विशाल मेगा मार्टचा शेअर ९८.५० रुपयांना लिस्ट होऊ शकतो. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स देण्यात आले आहेत, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी २६ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.

कंपनीचे समभाग मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) या दोन्ही ठिकाणी सूचीबद्ध होतील. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ९६.४६ टक्के होता, तो आता ७६.०२ टक्के होणार आहे.

आयपीओ २८ पटीहून अधिक सबस्क्राइब

विशाल मेगा मार्टचा आयपीओ एकूण २८.७५ पट सब्सक्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांच्या कोट्यातून कंपनीचा आयपीओ २.४३ पट सब्सक्राइब झाला. तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) कॅटेगरीला १५.०१ पट, तर क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) कॅटेगरीला ८५.११ पट सब्सक्रिप्शन मिळालं. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी एका लॉटसाठी आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी अर्ज करू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये १९० शेअर्स आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,८२० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

कंपनीचा इतिहास आणि वर्तमान

विशाल मेगा मार्ट कंपनीची सुरुवात २००१ साली झाली होती. विशाल मेगा मार्ट ही हायपरमार्केट साखळी आहे. ही कंपनी कपडे, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेस सारख्या उत्पादनांची विक्री करते. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीचं देशभरात ६४५ स्टोअर्सचं जाळं आहे. २८ राज्यांतील ४१४ शहरांमध्ये कंपनी सक्रिय आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner