IPO Listing News In Marathi : शेअर बाजार पडझडीच्या मूडमध्ये असताना नव्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना आधार दिला आहे. वन मोबिक्विक सोबतच शेअर बाजारात आज सूचीबद्ध झालेल्या विशाल मेगा मार्टच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे.
तब्बल ८ हजार कोटी रुपयांचा हा मेगा आयपीओ आज, १८ डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. हा शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी सूचीबद्ध झाला आहे. बीएसईवर हा शेअर ४१.०३ टक्के प्रीमियमवर ११० रुपयांवर लिस्ट झाला. तर एनएसईवर ३३ टक्के प्रीमियमसह १०४ रुपयांवर लिस्ट झाला. विशाल मेगा मार्टच्या आयपीओसाठी प्राइस बँड ७८ रुपये निश्चित करण्यात आला होता. हा इश्यू ११ डिसेंबरला गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि १३ डिसेंबरला बंद झाला.
विशाल मेगा मार्टचा ८,००० कोटी रुपयांचा आयपीओ बोलीच्या शेवटच्या दिवशी २७.२८ पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, आयपीओ ऑफर ७५,६७,५६,७५७ शेअर्ससाठी होती. मात्र प्रत्यक्षात २०,६४,२५,२३,०२० शेअर्ससाठी बोली लागली होती. पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीत हा आयपीओ ८०.७५ पट सब्सक्राइब झाला. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीत त्यास १४.२५ पट सब्सक्रिप्शन मिळालं. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (RII) श्रेणीत तो २.३१ पट सब्सक्राइब झाला. कंपनीनं मोठ्या (अँकर) गुंतवणूकदारांकडून २,४०० कोटी रुपये उभे केले होते.
गुरुग्रामस्थित सुपरमार्केट कंपनीचा आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेलचा भाग होता. प्रवर्तक केदार कॅपिटलच्या नेतृत्वाखालील समयत सर्व्हिसेस एलएलपीनं शेअर्स विक्रीस काढले होते. कोणतेही नवे इक्विटी शेअर्स सादर करण्यात आलेले नाहीत. सध्या या सुपरमार्केट कंपनीत समयत सर्व्हिसेस एलएलपीचा ९६.५५ टक्के हिस्सा आहे. ३० जून २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, विशाल मेगा मार्टचे संपूर्ण भारतात ६२६ सक्रिय स्टोअर्स आहेत. त्याशिवाय मोबाइल अॅप आणि वेबसाईटही आहे.