Share Market News Update : शेअर बाजारात सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणजे टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन आयडिया. आज पुन्हा एकदा ती चर्चेत आहे. कंपनीचा शेअर आज ५ टक्क्यांहून अधिक वधारला असून तो ८.१४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
व्हीआयचा शेअर सोमवारी ७.७४ रुपयांवर बंद झाला होता. शेअर्सच्या आजच्या वाढीमागे एक मोठं कारण आहे. वास्तविक, कंपनीनं निर्गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ओमेगा टेलिकॉम होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडनं व्होडाफोन आयडियाच्या प्रेफरेन्शियल इश्यूद्वारे १०,८४,५९४,६०७ इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. उषा मार्टिन टेलिमॅटिक्स लिमिटेडनं (UMTL) प्रेफरेन्शियल इश्यूद्वारे ६०८,६२३,७५४ अतिरिक्त इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. या व्यवहाराचे पडसाद शेअर बाजारात उमटल्याचं मानलं जात आहे.
गेल्या १ वर्षात व्हीआयच्या गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांहून अधिक तोटा झाला आहे, तर मागच्या सहा महिन्यातही तेवढाच तोटा झाला आहे. जानेवारी २०२५ मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र ५ वर्षांत कंपनीनं गुंतवणूकदारांना ८० टक्के नफा मिळवून दिला आहे.
‘सिटी’नं नुकतंच व्होडाफोन आयडियावर १३ रुपये प्रति शेअर (६० टक्के अपसाइड पोटेन्शियल) टार्गेट प्राइससह 'बाय' कॉल जारी केला आहे. सरकारनं बँक गॅरंटी शिथिल केल्यानं कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत २ टक्के आणि महिन्यात १ टक्के वाढ झाली आहे. मात्र, कंपनीचा शेअर वर्षभरात ५१ टक्के आणि सहा महिन्यांत ५२ टक्क्यांनी घसरला आहे.
संबंधित बातम्या