Vi Share Price : मोदी सरकारच्या एका घोषणेमुळं व्होडाफोन आयडियाला अच्छे दिन! शेअर चक्क १६ टक्क्यांनी वधारला
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vi Share Price : मोदी सरकारच्या एका घोषणेमुळं व्होडाफोन आयडियाला अच्छे दिन! शेअर चक्क १६ टक्क्यांनी वधारला

Vi Share Price : मोदी सरकारच्या एका घोषणेमुळं व्होडाफोन आयडियाला अच्छे दिन! शेअर चक्क १६ टक्क्यांनी वधारला

HT Marathi Desk HT Marathi
Nov 26, 2024 01:58 PM IST

Vi share price : स्पेक्ट्रम खरेदीसाठी टेलिकॉम ऑपरेटर्सना द्यावी लागणारी बँक गॅरंटी माफ करण्याची घोषणा मोदी सरकारनं केली आहे. त्याचा मोठा फायदा व्होडाफोन आयडियाच्या शेअरला झाला आहे.

सरकारच्या गॅरंटीचा व्होडाफोन आयडियाला मोठा लाभ, शेअर चक्क १६ टक्क्यांनी वधारला
सरकारच्या गॅरंटीचा व्होडाफोन आयडियाला मोठा लाभ, शेअर चक्क १६ टक्क्यांनी वधारला

vodafone idea bank guarantee : व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे (VIL) समभाग मंगळवारच्या व्यवहारात तब्बल १६ टक्क्यांनी वधारला. कंपनीचा शेअर आज इंट्राडे ८.११ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीसाठी सरकारनं केलेली एक घोषणा कारण ठरली आहे.

स्पेक्ट्रम खरेदीसाठी टेलिकॉम ऑपरेटर्सना द्यावी लागणारी बँक गॅरंटी (BG) माफ करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. व्होडाफोन आयडियाला याचा सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे, कारण सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सरकारकडे २४,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होणार होती.

मोठ्या घसरणीनंतर दिलासा

गेल्या पाच दिवसांत व्होडा आयडियाचा शेअर १० टक्क्यांनी वधारला आहे. मात्र, पूर्वी सातत्याने घसरण होत होती. गेल्या महिनाभरात हा शेअर १० टक्के तर सहा महिन्यांत ५० टक्क्यांनी घसरला आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर ५५ टक्क्यांनी घसरला आहे. त्यात वर्षभरात ४२ टक्के घट झाली आहे. दीर्घ मुदतीत हा शेअर जवळपास ९२ टक्क्यांनी घसरला आहे. या शेअरची किंमत एका क्षणी ११४ रुपये होती, ती सध्याच्या किमतीपर्यंत खाली आली आहे. शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत १९.१५ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ६.६० रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ५६३१७.४५ कोटी रुपये आहे.

कंपनीचा तोटा घटला!

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेडनं सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित तोटा ७१७५.९० कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला ८,७४६.६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या तिमाहीत सेवांमधून मिळणारे एकत्रित उत्पन्न १.८ टक्क्यांनी वाढून १०९१८.१० कोटी रुपये झालं आहे. या तिमाहीत कंपनीचा एकत्रित ऑपरेटिंग महसूल वाढून १०,९३२.२ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो १०,७१६.३ कोटी रुपये होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner