Vodafone Idea Share Price : दूरसंचार क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये आज तेजी दिसत आहे. एजीआर थकबाकीबाबत अर्थ सचिवांनी केलेल्या वक्तव्यानंतर शेअरमध्ये ही वाढ झाली आहे. व्होडाफोन आयडियाचा शेअर मंगळवारी, ४ फेब्रुवारी रोजी ९.२९ रुपयांवर खुला झाला आणि ९.६१ रुपयांवर पोहोचला.
सकाळी ११.४० वाजता व्हीआयचे शेअर ३.४२ टक्क्यांनी वधारून ९.३८ रुपयांवर व्यवहार करत होते. व्होडाफोन आयडियाचा सध्याचा थकीत एजीआर सुमारे ८०,००० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी व्होडाफोन आयडियाचा शेअर १० टक्क्यांनी वधारला. दिवसअखेर तो ७ टक्क्यांनी वधारून बंद झाला. सोमवारी हा शेअर ९.०८ रुपयांवर बंद झाला. मात्र अजूनही हा शेअर ११ रुपयांच्या एफपीओ मूल्यापेक्षा ५० टक्के आणि २०२४ च्या उच्चांकी १९.१८ रुपयांपेक्षा कमी आहे.
एकेकाळी ११८ रुपयांच्यावर असलेला आयडियाचा शेअर आज ९ ते १० रुपयांच्या दरम्यान फिरत आहे. एप्रिल २०१५ मध्ये तो ११८.९५ रुपयांवर पोहोचला. तेव्हापासून या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत असून मार्च २०२० पर्यंत तो जवळपास तीन रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यानंतर तो कमाल १९.१८ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ५ वर्षांच्या परताव्याबद्दल बोलायचं झाल्यास या शेअरनं ७७ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. तर, गेल्या वर्षभरात ३२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्याचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर ६.६१ रुपये आहे.
व्होडाफोन आयडियाच्या थकीत समायोजित सकल महसुलावर (AGR) अद्याप निर्णय झालेला नाही. हा प्रस्ताव अद्याप विचाराधीन असल्याचे संकेत वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांनी सीएनबीसी-टीव्ही १८ शी बोलताना दिले. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ वर चर्चा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 'यावर चर्चा सुरू आहे, याचा निर्णय घ्यावा लागेल, असं ते म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सीएनबीसी-टीव्ही १८ शी संवाद साधताना केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी थेट काही सांगणं टाळलं. सरकार थकीत एजीआर माफ करू शकतं अशा प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर मी भाष्य करणार नाही किंवा प्रस्ताव आहे की नाही यावरही भाष्य करणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिला आहे आणि तो तसाच आहे.
संबंधित बातम्या