UPI transactions without balance : डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात दिवसागणिक नवनव्या सुविधा येत आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानंही अशीच एक सुविधा आणली आहे. एनपीसीआय लवकरच यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांसाठी क्रेडिट लाइन सुविधा सुरू करणार आहे. या सुविधेमुळं बँक खात्यात पैसे नसले तरी बिनदिक्कत ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे.
सुमारे नऊ महिन्यांपूर्वी यूपीआयवर क्रेडिट लाइन सुविधा सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ही सुविधा सुरू झाल्यानंतर तुमचं यूपीआय खातं क्रेडिट कार्डप्रमाणे काम करेल. हे क्रेडिट लाइन म्हणजे बँक खाते वापरणाऱ्या ग्राहकासाठी प्री-अप्रूव्ह्ड लोन असेल. हे बँक खातं ग्राहकांच्या यूपीआय खात्यांशी जोडलेलं असेल.
प्रत्येक ग्राहकाला त्याच्या सिबिल स्कोअरनुसार क्रेडिट लाइन मिळेल, असं महामंडळाचं म्हणणं आहे. त्याचा वापर फक्त व्यापाऱ्याकडेच करता येणार आहे. त्या बदल्यात बँक निश्चित व्याजही आकारणार आहे. या संदर्भात महामंडळानं अनेक खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांशी चर्चा केली आहे. आतापर्यंत आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, पीएनबी, इंडियन बँक आणि अॅक्सिस बँक यांनी यासाठी सहमती दर्शविली आहे.
या सुविधेचा फायदा ग्राहकांसह दुकानदारांनाही होणार आहे. सध्या दुकानदारांना क्रेडिट कार्डद्वारे २००० पेक्षा जास्त पैसे भरल्यास सुमारे दोन टक्के शुल्क भरावं लागतं. यूपीआयमध्ये क्रेडिट लाइन मिळाल्यानंतर अशी फी भरावी लागणार नाही. क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला ठराविक कालावधीसाठी कोणतेही व्याज द्यावे लागत नाही, परंतु यूपीआयच्या क्रेडिट लाइनमध्ये वापरलेल्या रकमेवर व्याज द्यावं लागेल. हे एकप्रकारे ओव्हरड्राफ्ट सुविधेसारखं काम करेल.
प्रत्येक व्यवहारावर व्यापारी क्रेडिट जारीकर्त्याला कमिशन देतो, म्हणजेच इंटरचेंज. हे कमिशन मर्चंट डिस्काऊंट रेटच्या ९० टक्के असेल. व्यवहार अधिक सोयीस्कर व्हावा म्हणून व्यापारी हे शुल्क बँकांना देतात. कॉर्पोरेशन लवकरच यूपीआय क्रेडिट लाइनसाठी १.२ टक्के इंटरचेंजची घोषणा करू शकते. याबाबतचं परिपत्रक लवकरच जारी होण्याची शक्यता आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) क्यूआर कोड-आधारित युनिफाइड पेमेंटइंटरफेस पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी कतारमध्ये क्यूएनबी सुरू करण्यासाठी क्यूएनबीशी भागीदारी केली आहे. मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील सर्वात मोठी वित्तीय संस्था क्यूएनबीसोबत यूपीआय पेमेंट सुरू करण्यासाठी करार करण्यात आला आहे. या भागीदारीमुळे भारतीय पर्यटकांना किरकोळ दुकाने, पर्यटन आकर्षणे, विरंगुळा स्थळे, ड्युटी फ्री दुकाने आणि हॉटेल्समध्ये त्यांच्या पसंतीची पेमेंट पद्धत वापरण्याचा पर्याय उपलब्ध होईल.