Share Market News in Marathi : मेटल आणि खाण उद्योगातील आघाडीची भारतीय कंपनी वेदांता लिमिटेडनं लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं या संदर्भातील प्रस्तावास आज मंजुरी दिली. त्यानुसार भागधारकांना एका शेअरमागे ८.५ रुपये डिविडंड मिळणार आहे. अंतरिम लाभांश मंजूर करण्यात आला. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कंपनीनं दिलेला हा चौथा अंतरिम लाभांश आहे.
वेदांता लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक आज म्हणजेच सोमवार, १६ डिसेंबर २०२४ रोजी झाली. या बैठकीत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक शेअरवर ८.५ रुपये लाभांश देण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी पुढील आठवड्यातील २४ डिसेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. अंतरिम लाभांश कायद्यानुसार विहित मुदतीत देण्यात येईल, असं कंपनीनं आज दाखल केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
वेदांता कंपनीची ओळख 'डिविडंड किंग' अशी आहे. कंपनी सातत्यानं आपल्या शेअरहोल्डर्सना डिविडंड देत असते. डिविडंडची रक्कमही चांगली असते. गेल्या १२ महिन्यांत वेदांतानं प्रति शेअर ४६ रुपये लाभांश जाहीर केला आहे. तर, चालू आर्थिक वर्षात कंपनीने मे महिन्यात ११ रुपये, ऑगस्टमध्ये ४ रुपये आणि सप्टेंबरमध्ये २० रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. त्यात आता ८.५ रुपयांची भर पडली आहे. जुलै २००१ पासून कंपनीनं ४६ वेळा डिविडंड जाहीर केला आहे.
अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील कंपनीनं अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. वर्षभरात हा शेअर ९७ टक्क्यांनी वधारला आहे, तर गेल्या सहा महिन्यांत तो १५ टक्क्यांनी वधारला आहे. तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्यात १३ टक्के वाढ झाली आहे, तर गेल्या महिनाभरात त्यात सुमारे १९ टक्क्यांची भर पडली आहे. लाभांश जाहीर होण्याआधी आज बीएसईवर वेदांताच्या शेअरचा भाव १.२१ टक्क्यांनी घसरून ५१३.४० रुपयांवर बंद झाला.
लाभांशाच्या घोषणेव्यतिरिक्त कंपनीनं इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चकडून रेटिंग अपग्रेडचीही माहिती दिली. फिच समूहाचा भाग असलेल्या पतमानांकन एजन्सीनं वेदांताच्या नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) आयएनडी एए-वरील रेटिंग मध्ये सुधारणा केली आहे.
संबंधित बातम्या