सरत्या आठवड्यात सलग तीन सत्रांमध्ये घसरण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी शेअर बाजार सावरला. गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. निफ्टी १०४ अंकांनी वधारून २४,८५४ वर बंद झाला. तर, सेन्सेक्स २१८ अंकांनी वधारून ८१,२२४ वर बंद झाला. हा दिलासा असला तरी निफ्टी फिफ्टी पुन्हा २४,३५० ते २४,३०० च्या पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत काही मेटल स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.
लक्ष्मी श्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अंशुल जैन म्हणाले, ‘या घसरत्या बाजारात आकर्षक मूल्यांकनावर उपलब्ध शेअर्सची खरेदी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांगली गुंतवणूक रणनीती ठरू शकते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल येईपर्यंत बाजाराचा कल नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी मेटल शेअर्सवर लक्ष केंद्रित करावं. त्यातून दीर्घ मुदतीत उत्तम परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.’
हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी (रिसर्च) महेश एम ओझा म्हणाले, निफ्टी २५,०५० च्या वर जाईपर्यंत शुक्रवारची तेजी केवळ दिलासा देणारी तेजी आहे. २५,३०० चा अडथळा पार केल्यानंतरच बुल ट्रेंड आहे असं मानता येईल.' दीर्घ मुदतीत मेटल शेअर्सचा विचार करताना वेदांता, टाटा स्टील आणि एनएमडीसी या शेअर्सचा विचार केला जाऊ शकतो, असा सल्ला ओझा यांनी दिला आहे.
वेदांता, टाटा स्टील आणि एनएमडीसीपैकी कोणता शेअर अधिक परतावा देण्यास सक्षम आहे यावर स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक प्रवेश गौर यांनी प्रकाश टाकला आहे.
> 'दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वेदांता, टाटा स्टील आणि एनएमडीसीचा विचार करताना प्रत्येकाचे वेगळे फायदे दिसतात. धातू, तेल आणि वायू क्षेत्रात वेदांताचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे, परंतु कर्जाचा बोजा आणि जागतिक पातळीवरील वस्तूंच्या किंमतीमुळं जोखीम जास्त आहे. जोखीम घेणाऱ्यांसाठी हा शेअर उत्तम आहे.
> टाटा स्टीलनं जागतिक बाजारपेठेत चांगला जम बसवला आहे. पोलाद उद्योगात ही कंपनी आघाडीवर आहे आणि अलीकडं डीलिव्हरेजिंग आणि टिकाऊपणावर लक्ष केंद्रित केल्यानं तो एक मजबूत दीर्घकालीन पर्याय बनला आहे. मात्र बाह्य आर्थिक घडामोडींचा यावर तात्काळ परिणाम होतो, हे लक्षात घ्यायला हवं.
> प्रामुख्याने लोहखनिज खाणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एनएमडीसीवर कर्ज कमी आहे. कंपनीची बॅलन्स शीट सशक्त आहे. सार्वजनिक क्षेत्राच्या पाठिंब्यामुळं स्थिरताही आहे. असं असलं तरी या शेअरची वाढ इतरांच्या तुलनेत अधिक मर्यादित असू शकते.