Dividend Stock News : मेटल आणि खाण उद्योगातील आघाडीची कंपनी वेदांता लिमिटेडच्या गुंतवणूकदारांच्या वर्षाचा शेवट दणक्यात होणार आहे. वर्षभरात तीनदा डिविडंड देणाऱ्या वेदांतानं आता चौथ्यांदा डिविडंड देण्याचा विचार सुरू केला आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.
डिविडंड देण्याचे संकेत कंपनीकडून मिळाल्यानंतर गुरुवारी कंपनीच्या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. हा शेअर ५२६.५० रुपयांवर पोहोचला. येत्या १६ डिसेंबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे.
वेदांतानं स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. लाभांशासाठी बोर्डाची बैठक आधी ऑक्टोबरमध्ये होणार होती परंतु काही कारणांमुळं ती रद्द करण्यात आली होती. आता ती १६ डिसेंबरला होणार आहे. या बैठकीत चौथ्या अंतरीम लाभांशाला मंजुरी दिली जाईल. चौथ्या अंतरिम लाभांशासाठी कंपनीनं २४ डिसेंबर ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.
वेदांतानं या वर्षी आतापर्यंत तीन वेळा अनुक्रमे ११ रुपये, ४ रुपये आणि २० रुपये प्रति शेअर असा लाभांश जाहीर केला आहे. अशा प्रकारे, कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अंतरिम लाभांश म्हणून एकूण ३५ रुपये दिले आहेत.
वेदांता लिमिटेडनं चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत ४,३५२ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला १,७८३ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. वेदांताचं उत्पन्न मागील वर्षीच्या ३९,५८५ कोटी रुपयांच्या तुलनेत या तिमाहीत ३८,९३४ कोटी रुपयांवर घसरलं आहे.
वेदांता रिसोर्सेस लिमिटेडची उपकंपनी असलेल्या वेदांत लिमिटेडचा व्यवसाय भारत, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, लायबेरिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), दक्षिण कोरिया, तैवान आणि जपानमध्ये पसरलेला आहे. ही कंपनी तेल आणि वायू, जस्त, शिसे, चांदी, तांबे, लोह धातू, पोलाद, निकेल, ॲल्युमिनियम, उर्जा क्षेत्रात व्यवसाय करते.
संबंधित बातम्या