Vedanta Ltd Dividend News : खनिज उत्खनन क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेदांता लिमिटेडनं आपल्या भागधारकांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीनं १ शेअरमागे ४ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
वेदांता लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आज, २६ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत लाभांश वितरणावर चर्चा करण्यात आली व त्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर ४ रुपये अंतरिम लाभांश देण्यात येणार आहे. त्यासाठी ३ ऑगस्ट २०२४ ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्यांच्या डिमॅट खात्यात कंपनीचे शेअर असतील, तेच लांभाशासाठी पात्र ठरणार आहेत.
वेदांताच्या शेअरचा भाव शुक्रवारी एनएसईवर ४३७.१० रुपयांवर खुला झाला. दिवसभरात हा भाव ३.७९ टक्क्यांनी अर्थात, १६.३५ रुपयांनी वाढून ४४७.२५ रुपयांवर बंद झाला. वेदांताच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५०६.७५ आहे. तर, ५२ आठवड्यांचा नीचांक २०८ रुपये इतका आहे. शेअरचा भाव आज वाढला असला तरी मागच्या पाच दिवसांच्या तुलनेत शेअरची प्रत्यक्ष किंमत कमीच आहे.
गुंतवणूकदारांना घसघशीत लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत वेदांताचा क्रमाक बराच वरचा आहे. कंपनीनं याच वर्षीच्या मे महिन्यात प्रति शेअर ११ रुपये पहिला अंतरिम लाभांश मंजूर केला होता. पहिल्या अंतरिम लाभांशाची विक्रमी तारीख शनिवार, २५ मे २०२४ होती.
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीनं प्रत्येक शेअरमागे १०१.४ रुपये आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये प्रत्येक शेअरमागे २९.५ रुपये लाभांश जारी केला होता. त्याचा फायदा गुंतवणूकदारांबरोबरच पॅरेंट कंपनी वेंदाता रिसोर्सेसलाही झाला होता.
वेदांता लिमिटेडला कच्च्या धातूच्या किमतींमधील अनुकूलतेचा फायदा होत आहे. जून २०२४ च्या तिमाहीत सरासरी एलएमई अॅल्युमिनियमची किंमत १५ टक्क्यांनी वाढून २,५२५ डॉलर प्रति टन आणि अॅल्युमिनाची किंमत १७ टक्क्यांनी वाढली. झिंकची सरासरी किंमतही १६ टक्क्यांनी वाढून २,८३६ डॉलर प्रति टन झाली.
संबंधित बातम्या