Vedanta Quarterly Results : खनिज उत्खनन क्षेत्रातील आघाडीची कंपनी वेदांता लिमिटेडनं जून २०२४ च्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार, पहिल्याच तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल ५४ टक्के वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम शेअरवर होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारही सावध झाले आहेत.
वर्षभरापूर्वी याच तिमाहीत वेदांताला ३३०८ कोटी रुपये नफा झाला होता. त्या तुलनेत या वर्षीच्या तिमाहीचा नफा कितीतरी जास्त आहे. हा आकडा ५०९५ कोटी रुपये आहे. जून तिमाहीत कंपनीचा महसूल ६ टक्क्यांनी वाढून ३५,३२९ कोटी रुपये झाला आहे. तर वर्षभरापूर्वी महसुलाचा आकडा ३३,३४२ कोटी रुपये होता.
गेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित एबिटडा (EBITDA - Earning before interest, taxes, depreciation and amortization) ४७ टक्क्यांनी वाढून १०२७५ कोटी रुपयांवर पोहोचला होता. जून तिमाहीत एबिटडा मार्जिन ३४ टक्के होते. वार्षिक आधारावर यात १ हजार बीपीएसची वाढ झाली आहे. जून २०२४ तिमाहीअखेर निव्वळ कर्ज ६१,३२४ कोटी रुपये होतं.
वेदांताचे अरुण मिश्रा यांनी कंपनीच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 'कंपनीनं वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. आमचे अॅल्युमिनियम आणि झिंक विभाग उद्योगाच्या बेंचमार्कपेक्षा उत्तम कामगिरी करत आहेत. आमचे विकास प्रकल्प योग्य ट्रॅकवर आहेत आणि येत्या आर्थिक वर्षात यापैकी बहुतेक प्रकल्प कार्यान्वित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वेदांताच्या शेअरमध्ये मंगळवारी फारशी हालचाल दिसली नाही. एनएसईवर कंपनीचा शेअर आज ०.१६ टक्क्यांनी वाढून ४१३.९० वर बंद झाला. २२ मे २०२४ रोजी शेअरचा भाव ५०६.८५ रुपये होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे.
वेदांता लिमिटेडनं नुकतेच १९.३१ कोटी इक्विटी शेअर्सच्या क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) द्वारे ४४० रुपये प्रति शेअर इश्यू प्राइसवर ८,५०० कोटी रुपये (१ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त) उभे केले. १९ जुलै रोजी बंद झालेल्या या इश्यूनं ४६१.२६ रुपये प्रति शेअरच्या फ्लोअर प्राइसवर ४.६१ टक्के सूट दिली होती.
अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी (एडीआयए), गोल्डमन सॅक्स एएमसी, निप्पॉन म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, यूटीआय म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड आणि मिराई म्युच्युअल फंड या प्रमुख गुंतवणूकदारांना क्यूआयपीद्वारे इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यात आलं आहे.