share market news today : शेअर मार्केटमध्ये 'डिविडंड किंग' अशी ओळख असलेल्या वेदांता लिमिटेडनं गणेशोत्सवाच्या आगमनाआधी गुंतवणूकदारांना खूष करून टाकलं आहे. कंपनीनं आपल्या लौकिकाला जागत गुंतवणूकदारांसाठी एका शेअरमागे २० रुपये इतका भरघोस लाभांश जाहीर केला आहे.
वेदांताच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत लाभांशाच्या (Dividend) प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. लाभांशासाठी १० सप्टेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ या तारखेला गुंतवणूकदारांच्या अकाऊंटमध्ये जितके शेअर असतील, त्यावर त्यांना लाभांश मिळेल.
चालू आर्थिक वर्षात कंपनीनं लाभांश देण्याची ही तिसरी वेळ आहे. वेदांतानं या वर्षाच्या सुरुवातीला अनुक्रमे ११ रुपये आणि ४ रुपये प्रति शेअर असे दोन अंतरिम लाभांश जाहीर केले होते. आताचे २० रुपये जमेस धरल्यास चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत कंपनीनं भागधारकांना प्रति शेअर ३५ रुपये लाभांश दिला आहे. एप्रिल २०२३ नंतर कंपनीनं जाहीर केलेला हा सर्वाधिक लाभांश आहे. एप्रिल २०२३ मध्ये कंपनीनं प्रति शेअर २०.५ रुपये लाभांश जाहीर केला होता.
सध्याच्या लाभांशापोटी कंपनीला एकूण ७,८२१ कोटी रुपये खर्च होणार आहे. वेदांता लिमिटेडचे प्रवर्तक वेदांता रिसोर्सेसला लाभांशापोटी सध्याच्या हिस्सेदारीनुसार एकूण ४,४०९ कोटी रुपये मिळणार आहेत. ब्लॉक डील्स आणि संस्थात्मक समभाग विक्रीनंतर २० जुलैपर्यंत वेदांता रिसोर्सेसकडं वेदांता लिमिटेडमध्ये ५६.३८ टक्के हिस्सा होता. कंपनीकडं सध्या १७.४ लाख लहान भागधारक आहेत तसंच, जून तिमाहीअखेर २ लाख रुपयांपेक्षा कमी भांडवल असलेले भागधारक आहेत.
वेदांताचा शेअर आज किरकोळ घसरणीसह ४६४ रुपयांवर बंद झाला. मात्र, या वर्षी शेअरची वाटचाल सकारात्मक राहिली आहे. चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत या शेअरमध्ये ८० टक्के आणि वर्षभरात ९५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर ७० टक्क्यांनी वधारला आहे. पाच वर्षांत या शेअरनं २३० टक्के परतावा दिला आहे.