Vedanta Share price target : भरघोस लाभांश देत असल्यामुळं गुंतवणूकदारांची पसंती मिळणारा वेदांता लिमिटेडचा शेअर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील तीन महिन्यांपासून या शेअरमध्ये कमालीची तेजी आली असून हा शेअर ७७ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. ही तेजी यापुढंही कायम राहणार असून वेदांताच्या शेअर्समध्ये आणखी वाढ दिसून येईल, असं बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस नुवामा इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटीजच्या प्रतिनिधींनी वेदांताच्या प्रकल्पांना (ओरिसातील झारसुगुडा येथील अॅल्युमिनियम प्लाण्ट आणि राजस्थानमधील दरीबा येथील झिंक खाणी आणि स्मेल्टर) नुकतीच भेट दिली. या भेटीनंतर 'नुवामा'नं वेदांताच्या शेअर्सला 'बाय' रेटिंग कायम ठेवलं आहे. 'सीएनबीसी-टीव्ही १८' नं हे वृत्त दिलं आहे.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं वेदांता लिमिटेडच्या समभागांसाठी ६४४ रुपयांचं लक्ष्य ठेवलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं यापूर्वी वेदांताच्या शेअर्ससाठी ५४२ रुपयांचं टार्गेट दिलं होतं. खर्चात कपात, अॅल्युमिनियममधील वॉल्यूम ग्रोथ आणि व्यवसायाचं डीमर्जर पाहता ब्रोकरेज हाऊसनं वेदांताबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या प्रस्तावित डीमर्जरमुळं विद्यमान व्यवसायाचं सहा स्वतंत्र कंपन्यांमध्ये विलिनीकरण होईल. भारतीय स्टेट बँकेनं वेदांताच्या प्रस्तावित विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे.
वेदांता लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या ३ महिन्यांत ७७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १३ मार्च २०२४ रोजी कंपनीचा शेअर २५१.८५ रुपयांवर होता. १४ जून २०२४ रोजी मुंबई शेअर बाजारात वेदांताचा शेअर ४४७.१० रुपयांवर बंद झाला.
गेल्या ८ महिन्यांत वेदांताच्या शेअरमध्ये १०७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर २१५.७० रुपयांवर होता. वेदांताच्या शेअरनं १४ जून २०२४ रोजी ४४७ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ५०६.८५ रुपये आहे. तर वेदांताच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २०७.८५ रुपये आहे.
वेदांता लिमिटेडनं मागच्या १२ वर्षांत एकदा गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सची भेट दिली आहे. कंपनीनं एप्रिल २००८ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक शेअरवर १ बोनस शेअर दिला आहे.
संबंधित बातम्या