Stock To Watch : जलशुद्धीकरण व सांडपाणी प्रक्रिया क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी व्हीए टेक वाबागनं तब्बल (३७१ डॉलर) ३२५१ कोटी रुपयांचं कंत्राट मिळवलं आहे. सौदी अरेबियातील रियाध इथं २०० मेगालिटर प्रतिदिन (MLD) स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ISTP) विकसित करण्यासाठी ही ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळं सोमवारपासून या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर असेल.
कंपनीनं स्वत: रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ही माहिती दिली आहे. या प्रकल्पासाठी वा टेक वाबाग ही कंपनी मियाहोना, माराफिक आणि एनव्ही बेसिक्स एसए या कंपन्यांसोबत सहकार्य करणार आहे. हा प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया आणि रहिवाशांचं जीवनमान सुधारण्याच्या सौदी अरेबियाच्या व्हिजन २०३० चा एक भाग आहे.
वाबाग या प्रकल्पातील इंजिनीअरिंग, खरेदी आणि बांधकाम (EPC) कंसोर्टियममध्ये तंत्रज्ञान भागीदार आणि लीडर म्हणून कार्य करेल. स्वतत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं डिझाइन आणि बांधकामाची जबाबदारी वाबागकडे असेल, तर मुतलक अल-घोवारी कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी (MGC) ट्रान्समिशन पाइपलाइन आणि जलाशय बांधकाम हाताळेल.
गेल्या पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांनी वधारले असून एका महिन्यात आठ टक्क्यांनी घसरले आहेत. सहा महिन्यांत त्यात १० टक्के आणि यंदा आतापर्यंत १७ टक्के वाढ झाली आहे. मात्र, वर्षभरात हा शेअर १०५ टक्क्यांनी वधारला आहे. पाच वर्षांत त्यात ६०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ५९४.८० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत २५२.६८ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ६,५९५ कोटी रुपये आहे. सध्या हा शेअर १३९२.२० रुपयांवर ट्रेड करत आहे.
संबंधित बातम्या