US court penalised TCS : भारतातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान (IT) कंपनी असलेल्या TCS साठी एक वाईट बातमी आहे. अमेरिकेतील एका न्यायालयानं टीसीएसला व्यवसाय गुपितांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल १९४ दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे. याचबरोबर न्यायालयानं कंपनीवर काही निर्बंधही घातले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यानुसार, अमेरिकी न्यायालयानं आयटी सर्व्हिसेस DXC (पूर्वी कंपनीचे नाव CSC) ट्रेड सिक्रेट्सचा गैरवापर केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे. यातील ५६ दशलक्ष डॉलर हे दंडापोटी आणि ११२ दशलक्ष डॉलर हे नुकसानभरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. प्रीजजमेंट व्याजापोटी २५ दशलक्ष डॉलर १३ जूनच्या आधी भरावे लागतील, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
२०१८ मध्ये टीसीएस आणि अमेरिकी विमा कंपनी ट्रान्सअमेरिका (Transamerica) यांच्यात २.५ अब्ज डॉलर किमतीचा करार झाला होता. या करारानुसार ट्रान्सअमेरिकाच्या १० दशलक्ष ग्राहकांना एकाच व्यासपीठावर सर्व सुविधा पुरविल्या जाणार होत्या. गेल्या वर्षी जूनमध्ये हा करार रद्द करण्यात आला. आर्थिक परिस्थितीचं कारण देऊन हा करार मोडण्यात आला होता.
अमेरिकी कोर्टाच्या निर्णयावर टीसीएसनं प्रतिक्रिया दिली आहे. '१४ जून २०२४ रोजी म्हणजेच, काल न्यायालयाच्या आदेशाची प्रत आम्हाला मिळाली आहे. या निर्णयाचा प्रतिवाद करण्यासाठी आमच्याकडं अनेक ठोस मुद्दे आहेत. या संदर्भात योग्य न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची आमची योजना आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे.
‘या निर्णयाचा कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर आणि दैनंदिन कामकाजावर कोणताही मोठा प्रतिकूल परिणाम होणार नाही. कंपनी आपल्या हितांचं रक्षण करण्यासाठी आणि या निर्णयामुळं निर्माण झालेल्या कायदेशीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक पावलं उचलत आहे,’ असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या