FD Interest : एफडीवर ९ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज; एकाच वेळी तीन बँकांची खास ऑफर
Interest on Bank FDs : रेपो दरातील वाढीनंतर बँका त्यांच्याकडील मुदत ठेवींवर जास्तीत जास्त व्याज देत असून हे व्याजदर आता ९.५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत.
Interest on FDs : गेल्या वर्षीच्या मे महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं रेपो दरात २.५ टक्क्यांनी (२५० बेसिस पॉइंट्स) वाढ केली आहे. तो निर्णय आल्यापासून बहुतेक बँका त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात सातत्यानं वाढ करत आहेत. काही बँकांनी यात आघाडी घेतली असून त्यांनी ९ टक्क्यांपेक्षाही जास्त व्याज देणं सुरू केलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेनं १५ फेब्रुवारी २०२३ रोजी २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. १००१ दिवसांच्या ठेवींवर बँक जास्तीत जास्त ९.५० टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवर हे व्याज दिलं जात आहे. अन्य लोकांना या कालावधीच्या ठेवींवर ९ टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय, १८१-२०१ दिवस आणि ५०१ दिवसांच्या मुदत ठेवींवर युनिटी स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्यांना ८.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ९.२५ टक्के व्याज देत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेनं २७ फेब्रुवारी २०२३ रोजी २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. उत्कर्ष बँक ज्येष्ठ नागरिकांना ७०० दिवसांच्या मुदत ठेवीवर ९ टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, ही बँक सामान्य ठेवीदारांना याच कालावधीच्या मुदत ठेवीवर ८.२५ टक्के व्याज देत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचा व्याजदर
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेनं २४ मार्च २०२३ रोजी २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या १ हजार दिवसांच्या मुदत ठेव योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ९.०१ टक्के व्याज मिळत आहे. तर, सामान्य ग्राहकांना ८.४१ टक्के व्याज दिलं जात आहे.
(वैधानिक सूचना: ही केवळ गुंतवणुकीची माहिती आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केट व अन्य गुंतवणुकीमध्ये जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)