Union Budget 2024 : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प मंगळवार, २३ जुलै २०२४ रोजी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता संसदेत २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांनी आपापल्या मागण्या पुढं रेटल्या आहेत. काही अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नवीन पेन्शन प्रणाली आणि आयुष्मान भारत यांसारख्या सामाजिक सुरक्षेशी संबंधित योजनांबाबत अर्थसंकल्पात काही घोषणा होण्याची शक्यता आहे. तर, प्राप्तीकराच्या बाबतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा काही जण व्यक्त करत आहेत. त्यामुळं बजेटची उत्सुकता वाढली आहे. हे बजेट लाइव्ह कुठे आणि कधी बघता येईल? यासह इतर सर्व माहिती जाणून घेऊया…
तारीख - मंगळवार, २३ जुलै २०२४
वेळ : सकाळी ११ वाजल्यापासून.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ च्या भाषणाचे लाइव्ह स्ट्रीमिंग विविध प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर बजेटचं थेट प्रक्षेपण होईल. तसंच, संसद टीव्ही आणि दूरदर्शनच्या अधिकृत YouTube चॅनेलवर हे भाषण ऑनलाइन पाता येणार आहे. अर्थ मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट www.finmin.nic.in वर थेट प्रसारण होईल. याशिवाय, अर्थ मंत्रालयाच्या https://x.com/FinMinIndia या ट्विटर अकाउंटवर देखील पाहता येईल. हिंदुस्तान टाइम्स मराठीवरही तुम्ही केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ लाइव्ह अपडेट पाहू शकता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणानंतर केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ चा दस्तऐवज ऑनलाइन उपलब्ध केला जाणार आहे. हा दस्तऐवज सरकारच्या अधिकृत वेबसाइट www.indiabudget.gov.in वर हिंदी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये तपासू शकता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि नवीन सरकारच्या स्थापनेमुळं केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ जुलैमध्ये सादर केला जात आहे. यापूर्वी १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. साधारणपणे, सार्वत्रिक निवडणुकीच्या वर्षात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो आणि नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो. यंदाही तसंच होत आहे.