Stock Market Updates : युनिमेक एअरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडचा आयपीओ लागलेल्या गुंतवणूकदारांचा वर्षाचा शेवट गोड झाला आहे. कंपनीचा आयपीओ आज ९० टक्क्यांच्या प्रीमियमसह सूचीबद्ध झाला आहे. आयपीओमध्ये ७८५ रुपये किंमत असलेला हा शेअर बीएसईवर १,४९१ रुपयांवर सूचीबद्ध झाला. एनएसईवर हा शेअर ८६ टक्क्यांच्या प्रीमियमसह १,४६० रुपयांवर लिस्ट झाला.
युनिमॅक्स एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडचा आयपीओ २३ डिसेंबर रोजी खुला झाला आणि २६ डिसेंबर रोजी बंद झाला. निविदेच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा आयपीओ १७४.९३ पट सब्सक्राइब झाला होता.
एनएसईच्या आकडेवारीनुसार, ५०० कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये ४७,०४,०२८ शेअर्सची ऑफर होती. मात्र प्रत्यक्षात ८२,२८,९३,०४० शेअर्ससाठी सब्सस्क्रिप्शन आलं. पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा (QIB) कोटा ३१७.६३ पट, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा २६३.४० पट सब्सक्राइब झाला. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (RII) श्रेणीत हा आयपीओ ५६.१६ पट सब्सक्राइब झाला.
या आयपीओमध्ये २५० कोटी रुपयांपर्यंतचा नवा इश्यू आणि २५० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर फॉर सेल (OFS) चा समावेश होता. या आयपीओसाठी ७४५ ते ७८५ रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता.
युनिमेक एरोस्पेस ही कंपनी जागतिक दर्जाची अभियांत्रिकी सोल्यूशन्स कंपनी आहे. कंपनीनं एअरोस्पेस, डिफेन्स, सेमीकंडक्टर आणि एनर्जी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसाठी स्वीकृत पुरवठादार म्हणून स्वतःला प्रस्थापित केलं आहे. कंपनीनं आपल्या उत्पादनांशी संबंधित सर्व ग्राहकांच्या विशिष्ट आणि बदलत्या गरजा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सुविधा विकसित केल्या आहेत.
आयपीओमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर मशिनरी आणि उपकरणांच्या खरेदीद्वारे कंपनीच्या विस्तारासाठी व भांडवली खर्चासाठी करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीच्या कार्यशील भांडवलाची गरज भागविण्यासाठी यंत्रसामुग्री व उपकरणं खरेदी करणं, उपकंपनीच्या भांडवली खर्चाचा निधी, उपकंपनीच्या कार्यशील भांडवलाच्या गरजेचा निधी पुरविणे आणि भौतिक उपकंपनी व सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतूनं काही कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/पूर्वपरतफेड करणं ही आयपीओची उद्दिष्टं आहेत.
संबंधित बातम्या