Ultratech Cement Dividend : सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी अल्ट्राटेक सिमेंटनं गुंतवणूकदारांना जबरदस्त बातमी दिली आहे. कंपनीनं भागधारकांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार प्रत्येक शेअरमागे ७० रुपये लाभांश दिला जाणार आहे. लाभांशासाठी पात्र ठरण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२४ आहे. त्यामुळं कंपनीच्या शेअर्सवर आज नजर ठेवावी लागणार आहे.
अल्ट्राटेक सिमेंटनं शेअर बाजाराला नुकतीच या संदर्भात माहिती दिली आहे. पात्र गुंतवणूकदारांना १ शेअरवर ७० रुपये लाभांश दिला जाईल. या लाभांशाची रेकॉर्ड डेट यापूर्वीच ३० जुलै रोजी जाहीर करण्यात आली होती. रेकॉर्ड डेट याचा अर्थ या तारखेला ज्या गुंतवणूकदाराच्या नावे शेअर असतील, त्याच गुंतवणूकदारांना लाभांश मिळतो.
अल्ट्राटेक सिमेंट सध्या चर्चेत आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं रविवारी इंडिया सिमेंट्स लिमिटेडमधील अतिरिक्त ३२.७२ टक्के हिस्सा खरेदी करण्यास मंजुरी दिली. या व्यवहारासाठी कंपनीला ३९५४ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इंडिया सिमेंटवर अल्ट्राटेक सिमेंटचं नियंत्रण राहणार आहे. त्यांचा हिस्सा ५० टक्क्यांहून अधिक असेल. दक्षिण भारतात इंडिया सिमेंटचं चांगलं वर्चस्व आहे. कंपनीनं इंडिया सिमेंटमधील २६ टक्के हिस्सा खरेदी करण्याची खुली ऑफर जाहीर केली आहे. यासाठी कंपनी ३१४२.३५ कोटी रुपये खर्च करणार आहे.
जून तिमाहीत अल्ट्राटेक सिमेंटचा नफा १६९६.५९ कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कमी विक्रीमुळं कंपनीला धक्का बसला आहे. एप्रिल ते जून दरम्यान अल्ट्राटेकचा महसूल १.८९ टक्क्यांनी वाढून १८,०६९.५६ कोटी रुपये झाला आहे. तर, कंपनीनं या काळात १६,१२८.३७ कोटी रुपये खर्च केले आहेत.
अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरची वाटचाल सकारात्मक आहे. मागच्या वर्षभरात कंपनीनं गुंतवणूकदारांना ४० टक्के रिटर्न्स दिले आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत कंपनीचा शेअर ११ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तर, मागच्या सहा महिन्यात शेअरमध्ये १७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र शेअरमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात शेअर २ टक्क्यांहून जास्त पडला आहे. आजही शेअर घसरला आहे. सध्या हा शेअर ११,६५०.९५ रुपयांवर ट्रेड करत आहे.
संबंधित बातम्या