ujjivan small finance bank : शुक्रवारी ट्रेडिंग मुहूर्ताच्या निमित्ताने काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये वादळी तेजी पाहायला मिळाली. असाच एक शेअर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा आहे. या बँकेचा शेअर १.९४ टक्क्यांनी वधारून ३८.८५ रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान या शेअरने ३८.९७ रुपयांचा उच्चांक गाठला.
डिसेंबर २०२३ मध्ये या शेअरने ६२.९९ रुपयांचा उच्चांक गाठला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. तर २५ ऑक्टोबर २०२४ रोजी शेअरने ३४.४५ रुपयांची पातळी गाठली होती. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा नफा २९ टक्क्यांनी घसरून २३३ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचा नफा ३२८ कोटी रुपये होता. या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून १८२० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १५८० कोटी रुपये होते. सप्टेंबर तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वाढून १,६१३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १,३९१ कोटी रुपये होते.
सप्टेंबर तिमाहीअखेर बँकेचा एकूण एनपीए वाढून एकूण कर्जाच्या २.५२ टक्के झाला आहे, जो गेल्या वर्षी २.३५ टक्के होता. मात्र, निव्वळ एनपीए किंवा बुडीत कर्जाचे प्रमाण घटून ०.५६ टक्क्यांवर आले आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ०.८९ टक्के होते. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण सप्टेंबर २०२३ अखेर २५.१९ टक्क्यांवरून २३.३८ टक्क्यांवर आले आहे.