मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Market : २९१ रुपयांवरून ९२ रुपयांवर आला टाटाच्या कंपनीचा शेअर, आता खरेदीसाठी झुंबड

Share Market : २९१ रुपयांवरून ९२ रुपयांवर आला टाटाच्या कंपनीचा शेअर, आता खरेदीसाठी झुंबड

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 07, 2024 02:09 PM IST

TTML Share price News : टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र या कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळं तो स्वस्तात खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे.

TTML Share price
TTML Share price

TTML Share Price : भावातील चढउतार हे शेअर बाजाराचं खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळं आज उच्चांकी भाव नोंदवणारा शेअर उद्या नेमका कुठं असेल हे सांगता येत नाही. अभ्यासू आणि सजग गुंतवणूकदार या सगळ्यावर बारीक लक्ष ठेवून कमाईची संधी साधत असतात. अशीच एक संधी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडच्या शेअरमध्ये सध्या शोधली जात आहे. हा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. 

टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडचे ​​शेअर्स (TTML) आज रडारवर आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये आज ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. काल, मंगळवारी कंपनीचा शेअर ९२ रुपयांवर बंद झालेला हा शेअर आता ९६.८५ रुपयांवर गेला आहे. कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल या तेजीसाठी कारणीभूत ठरले आहेत.

डिसेंबर तिमाहीत टीटीएमएलला ३०७ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. त्याआधीच्या सप्टेंबर तिमाहीत निव्वळ तोट्याचा हा आकडा ३१० कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत कंपनीला तब्बल ९१९ रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे.

असा आहे शेअरचा प्रवास

बीएसईवर उपलब्ध आकडेवारीनुसार, टीटीएमएल शेअर्स गेल्या एका वर्षात २७ टक्के आणि गेल्या सहा महिन्यांत २१ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या पाच वर्षांत टीटीएमएलच्या शेअरनं ३२६८.७९ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या कालावधीत शेअरची किंमत २ रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली आहे. टीटीएमएलच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १०९.१० रुपये इतका आहे आणि ५२ आठवड्यांची निचांकी किंमत ४९.८० रुपये आहे. टाटा समूहाचा हा शेअर ११ जानेवारी २०२२ रोजी २९१.०५ रुपयांवर पोहोचला होता. हा या शेअरचा सार्वकालिक उच्चांक आहे. सध्या हा शेअर त्याच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा ६६ टक्के कमी किंमतीवर उपलब्ध आहे.

काय करते टीटीएमएल?

टीटीएमएल ही टाटा टेलिसर्व्हिसेसची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनी व्हॉइस आणि डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. कंपनीचं बाजार भांडवल १८,५६३.९९ कोटी रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग