Top Ten Chemical Stocks : प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या इंधनापासून जगातील सर्वच देश वेगानं फारकत घेत असून स्वच्छ व हरित ऊर्जेचे मार्ग अवलंबत आहेत. भारतही त्यात मागे नाही. गेल्या काही वर्षांपासून भारतानं इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या उत्पादनांकडं मोर्चा वळवला असून त्यामुळं ईव्ही बॅटरीची मागणी वाढली आहे. याचा फायदा बॅटरीचं उत्पादन करणाऱ्या व त्यांना कच्चा माल पुरवणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. त्यामुळं या कंपन्यांच्या शेअरमधील गुंतवणूक मोठा फायदा देण्याची शक्यता आहे.
जगभरातील छोट्या-मोठ्या कंपन्या आता ईव्ही बॅटरीच्या उत्पादनाकडं वळल्या आहेत. व्हिएतनामची ईव्ही उत्पादक कंपनी विनफास्ट तामिळनाडूमध्ये बॅटरी तयार करण्यासाठी आपला पहिला प्रकल्प सुरू करणार आहे. भारतातील केमिकल कंपन्याही ईव्ही बॅटरी पुरवठा साखळीत स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
ईव्ही बॅटरी निर्मितीसाठी कॅथोड, अॅनोड, इलेक्ट्रोलाइट्स सह इतर रासायनिक घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक लागते. काही कंपन्या यात आक्रमकपणे उतरल्या आहेत. त्याचा थेट फायदा या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना होणार आहे. पाहूया कोणत्या आहेत या केमिकल कंपन्या?
हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स (Himadri Specialty Chemicals)
हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स लिथियम-आयन बॅटरीच्या पार्ट्सच्या उत्पादनासाठी पुढील ५ ते ६ वर्षांत ४८ अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार आहे. वर्षाला २ लाख टन इतक्या क्षमतेनं बॅटरी पार्ट्सचं उत्पादन करण्यासाठी कंपनी उत्पादन सुविधा उभारणार आहे.
सध्या स्मॉलकॅप श्रेणीत असलेली ही कंपनी लवकरच एका वैविध्यपूर्ण रासायनिक कंपनीत रुपांतरित होण्याच्या मार्गावर आहे. कंपनी कार्बन ब्लॅक, कोल टार पिच आणि प्रगत कार्बन सामग्रीसह विविध क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विशेष रसायनांची निर्मिती करते. हिमाद्रीच्या शेअर्समध्ये मागच्या वर्षात २०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ही कंपनी देशातील सर्वात मोठा कोल टार डिस्टिलेशन प्लांट चालवते. हिमाद्री कंपनी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाशी पीएलआयच्या (Production Linked Scheme) संदर्भात चर्चा करत आहे.
अॅमी ऑर्गेनिक्स (Ami Organics)
दुसऱ्या क्रमांकावर अॅमी ऑर्गेनिक्स आहे. ही कंपनी बहुपयोगी स्पेशालिटी केमिलकलचं उत्पादन करते. गुजरात ऑरगॅनिक्स ताब्यात घेतल्यापासून या कंपनीनं अॅग्रो केमिकल आणि फाइन केमिकलच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं आहे.
आधीपासूनच सेमीकंडक्टरच्या निर्मितीमध्ये असलेली अॅमी ऑर्गेनिक्स आता इलेक्ट्रोलाइट्ससाठी उत्पादन सुविधा उभारण्याच्या विचारात आहे. कंपनी लवकरच प्रकल्प उभारणीसाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार करणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचे शेअर्स रेंगाळताना दिसत आहेत. महत्त्वाची उत्पादनं बाजारात आणण्यास उशीर केल्यानं चालू आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांची निराशा झाली. २०२४ च्या अखेरच्या तिमाहीत कंपनीला मजबूत कामगिरीची अपेक्षा आहे.
एथर इंडस्ट्रीज (Aether Industries)
स्पेशालिटी केमिकल्सची निर्मिती करणारी एथर इंडस्ट्रीज या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. फिनॉल (४ एमईपी), ३-मेथॉक्सी-२-मेथिलबेंझिल क्लोराइड (एमएमबीसी) यासह निवडक रसायनांचं उत्पादन करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. डिसेंबर २०२३ मध्ये कंपनीनं जागतिक लिथियम-आयन बॅटरी निर्मात्यासोबत धोरणात्मक करार करून इलेक्ट्रोलाइट एडिटिव्ह्स आणि बॅटरी सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनी फ्लोरिनेशनमधील संधीदेखील शोधत आहे आणि मेटल फ्लोराइड बाजारात प्रवेश करण्याची अपेक्षा आहे. एथर इंडस्ट्रीजच्या एका कारखान्याला लागलेल्या आगीमुळं कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीवर परिणाम झाला होता. येत्या काळात या कंपनीच्या व्यवसायात प्रगतीची अपेक्षा आहे.
निओजेन केमिकल्स (Neogen Chemicals)
निओजेन केमिकल्स ही कंपनी फार्मा, कृषी रसायनं आणि अभियांत्रिकी उद्योगांमध्ये वापरली जाणारी ब्रोमीन आणि लिथियम-आधारित सेंद्रिय आणि ऑर्गनो-मेटालिक कम्पाउंड तयार करते. मागच्या ३० वर्षांपासून ही कंपनी लिथियम कार्बोनेट आणि लिथियम हायड्रॉक्साईडची सर्वात मोठी आयातदार आहे. ही कंपनी प्रत्यक्ष ईव्ही बॅटरी तयार करत नाही मात्र, त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करते. कंपनी ३० हजार किलो टन वार्षिक (केटीपीए) क्षमतेचा इलेक्ट्रोलाइट प्लांट उभारण्याची योजना आखत आहे.
टाटा केमिकल्स (Tata Chemicals)
टाटा समूह लिथियम-आयन बॅटरी निर्मितीमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. साणंद प्रकल्प हा टाटा मोटर्सचा भारतातील सर्वात मोठा उत्पादन प्रकल्प आहे. कंपनी सध्या टियागो, नेक्सॉन आणि अल्ट्रोज सह विविध प्रकारच्या वाहनांचं उत्पादन करते. साणंद प्रकल्पाच्या विस्तारात नवीन लिथियम-आयन बॅटरी उत्पादन सुविधेची भर पडणार आहे. ती २०२५ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
टाटा केमिकल्स ईव्ही बॅटरीसाठी टाटांच्या दीर्घकालीन दृष्टीकोनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. टाटा केमिकल्सनंच लिथियम आयन सेलसाठी २० गिगावॅट क्षमतेचे उत्पादन युनिट उभारण्यासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला होता.
टाटा समूहानं गिगाफॅक्टरी उभारण्यासाठी १.६ अब्ज डॉलर्सचा ईव्ही बॅटरी प्लांट करार केल्यापासून कंपनी गुंतवणूकदारांच्या रडारवर आहे.
गुजरात फ्लोरोकेमिकल्स (Gujarat Fluorochemicals)
गुजरात फ्लोरोकेमिकल्स ही भारतातील फ्लोरो-पॉलिमर, फ्लोरो-स्पेशालिटीज, रसायने आणि रेफ्रिजरंट्सची आघाडीची उत्पादक आहे. युरोप, अमेरिका, जपान आणि आशियामध्ये निर्यात करणारी ही फ्लोरोपॉलिमर बाजारपेठेतील पहिल्या पाच कंपन्यांपैकी एक आहे. फ्लोरीन केमिस्ट्री कौशल्य वापरून ईव्ही बॅटरीसाठी लागणारी रसायनं तयार करते.
जीसीएफएल ईव्ही प्रॉडक्ट्स नावाच्या उपकंपनीच्या माध्यमातून बॅटरी रसायनं आणि ग्रीन हायड्रोजन सारख्या सेगमेंटमध्ये सुमारे १ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची महत्वाकांक्षी योजना आहे.
सप्टेंबर २०२३ तिमाहीचे कमकुवत निकाल व इतरही काही गोष्टींचा कंपनीच्या शेअरला काही प्रमाणात फटका बसला आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस व्यवसायात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
तत्व चिंतन फार्मा (Tatva Chintan Pharma)
तत्व चिंतन फार्मा ही कंपनी स्पेशालिटी केमिकल्सच्या विशिष्ट विभागात कार्यरत आहे. बाजारपेठेतील अग्रगण्य उत्पादनांसह जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त स्पेशालिटी केमिकल प्लेअर आहे. ही भारतातील झिओलाइट्ससाठी स्ट्रक्चर-डायरेक्शन एजंट्सची सर्वात मोठी आणि एकमेव व्यावसायिक उत्पादक आहे. तत्त्व चिंतन इलेक्ट्रोलाइट सॉल्व्हंट स्पेसमध्ये प्रवेश करीत आहे.
गाडी सुरू करण्यासाठी आणि तिचा वेग वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या रसायनांची निर्मिती तत्व चिंतन फार्मा करते.
सध्याच्या परिस्थितीमुळं, कंपनीच्या इलेक्ट्रोलाइट सॉल्ट सेगमेंटच्या महसुलात घट झाली आहे. मात्र, पुढील दोन वर्षांत नवीन उत्पादनं आणि उत्पादन वाढीमुळं कंपनीला महसूल आणि मार्जिनमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.
कंपनीची उत्पादनं केवळ ईव्हीमध्येच वापरली जात नाहीत तर वाहतूक आणि पायाभूत सुविधा, अक्षय्य ऊर्जा, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, ग्रीड बॅलन्सिंग आणि इतर अशा ट्रेंडमध्ये वापरली जातात.
बालाजी अमाइन्स (Balaji Amines)
बालाजी अमाइन्स ही कंपनी अॅलिफॅटिक अमाइन्सची आघाडीची उत्पादक आहे. फार्मास्युटिकल्स, कृषी रासायनिक क्षेत्र, रंग, तेल आणि वायू यांसारख्या क्षेत्रात लागणाऱ्या काही विशिष्ट रसायनांची एकमेव उत्पादक आहे. बालाजी अमाइन्स डाय मिथाइल कार्बोनेटची देशातील एकमेव उत्पादक आहे.
बालाजी अमाइन्सला ईव्ही उद्योगात शिरकाव करण्याची मोठी संधी आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीचा डीएमसी प्रकल्प सुरू झाला आहे. मधल्या काळात विविध घटना-घडामोडींचा शेअरच्या कामगिरीला फटका बसला होता. आता नवीन उत्पादनं लाँच करण्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करीत आहे. डीएमसी, पीजी, इथिलामाइन्स सारख्या नवीन प्रकल्पांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा परिणाम नव्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नावर दिसेल, अशी अपेक्षा आहे.
पीसीबीएल (PCBL)
आरपी-संजीव गोएंका समूहाचा भाग असलेली पीसीबीएल कंपनी कार्बन ब्लॅकचे उत्पादन आणि कॅप्टिव्ह वापरासाठी वीज निर्मिती आणि अतिरिक्त विक्रीचे काम करते. लिथियम-आयन बॅटरीसाठी कार्बन ब्लॅक मार्केटमधील ही एक प्रमुख कंपनी आहे.
लिथियम-आयन बॅटरीसाठी कार्बन ब्लॅकची मागणी सध्याच्या २०,००० टन वार्षिक (टीपीए) वरून २०३० पर्यंत ८४,००० टीपीएपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचा अहवाल एका रेटिंग एजन्सीने प्रसिद्ध केल्यानंतर कंपनीचे शेअर वधारले आहेत. २०२३ मध्ये पीसीबीएलचे शेअर्स १०० टक्क्यांहून अधिक वाढले. त्यामुळं भागधारकांना मल्टीबॅगर परतावा मिळाला. पीसीबीएलनं नुकतंच अॅक्वाफार्म केमिकल्स ही कंपनी ३८ अब्ज रुपयांना ताब्यात घेत नॉन-कार्बन ब्लॅक क्षेत्रातही प्रवेश केला आहे. तसंच, ऑस्ट्रेलियातील किनालटेक कंपनीसोबत संयुक्त सहकार्य कराराची घोषणा केली आहे. यात कंपनी १.३ अब्ज रुपयांची गुंतवणूक करेल.
याशिवाय, बॅटरीसाठी नॅनो सिलिकॉन तंत्रज्ञानाची निर्मिती सुविधा उभारण्यासाठी येत्या दोन वर्षांत दोन अब्ज रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.
पॉन्डी ऑक्साईड अँड केमिकल्स (Pondy Oxides & Chemicals)
पॉन्डी ऑक्साईड ही कंपनी शिसे आणि शिसे मिश्रधातू आणि पीव्हीसी एडिटिव्ह्सच्या उत्पादनात आहे. बॅटरी उत्पादक आणि केमिकल उत्पादक कंपन्या पॉन्डी ऑक्साइडच्या मुख्य ग्राहकांमध्ये आहेत.
मेटल, मेटॅलिक ऑक्साइड्स, पीव्हीसी स्टॅबिलायझर्स आणि लेड अॅसिड बॅटरीमध्येही कंपनी काम करते. कंपनी सध्या लिथियम-आयन रिसायकलिंग तंत्रज्ञानाचा शोध घेत आहे. लिथियम-आयन आणि ई-वेस्ट सेगमेंटमध्ये नवीन रिसायकलिंग व्हर्टिकल सादर करण्याची कंपनीची योजना आहे.
याशिवाय ही कंपनी प्लास्टिक (इन-हाऊस आणि इंडस्ट्रियल), ई-कचरा, लिथियम-आयन रिसायकलिंग, रबर, तेल, काच, कागद आणि मूल्यवर्धित उत्पादनं यासारखे सेंद्रिय किंवा अजैविक पद्धतीनं नवीन श्रेणी आणण्याची योजना आखत आहे.
शिशाची क्षमता दुप्पट करण्यासाठी कंपनीनं विविध प्रकल्प व यंत्रसामुग्रीमध्ये सुमारे एक अब्ज रुपयांचा भांडवली खर्चाची योजना हाती घेतली आहे. २०२५ या आर्थिक वर्षापर्यंत पॉन्डी ऑक्साईड्सने २० अब्ज रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवलं आहे. २०२३ मध्ये ते १४.८ अब्ज रुपये इतकं होतं.
(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या