मराठी बातम्या  /  बिझनेस  /  जगाची सध्याची आर्थिक स्थिती भारतीयांसाठी फायदेशीरच: डॉ. दातार

जगाची सध्याची आर्थिक स्थिती भारतीयांसाठी फायदेशीरच: डॉ. दातार

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Oct 07, 2022 04:49 PM IST

जगाचे सध्याचे आर्थिक चित्र संमिश्र आहे. भारतासारख्या देशाला त्यातून नव्या संधीही मिळणार असून त्याचा फायदा निवासी तसेच अनिवासी भारतीयांना होईल…

Dr Dhananjay Datar
Dr Dhananjay Datar

जगाचे सध्याचे आर्थिक चित्र संमिश्र आहे. एकीकडे युद्धजन्य परिस्थिती, वाढती महागाई, लहरी हवामानामुळे काही देशांत ओला तर काहींमध्ये कोरडा दुष्काळ पडला आहे. तसेच मंदीची भेडसावणारी चिंता सतावतेय. काही देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आल्याची स्थिती आहे. मात्र त्याचवेळी भारतासारख्या देशाला त्यातून नव्या संधीही मिळणार असून त्याचा फायदा निवासी तसेच अनिवासी भारतीयांना होईल, अशी शक्यता दुबईस्थित अल अदील उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दातार पुढे म्हणाले, ‘भारतातून आखाती देशांना प्रामुख्याने सागरी मार्गाने अन्नधान्य व वस्तूंची निर्यात होते. भारत संयुक्त अरब अमिरातीला मोठी निर्यात करतो. त्यासाठी लागणारे कंटेनर्स गेली दोन वर्षे कमी संख्येने उपलब्ध होते. त्यातही कोरोना काळात चीनकडून आयातीची मोठी मागणी असल्याने उपलब्ध कंटेनर्सचा मोठा साठा त्या मार्गावर वापरला जात होता. साहजिकच प्रति कंटेनर वाहतूक शुल्क भरमसाट वाढले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये २० फुटी कंटेनरसाठी ११०० डॉलर्स इतके मोजावे लागत असत. परिणामी दुबई व अन्य आखाती देशांमधल्या ग्राहकांना महागाईच्या झळा बसत होत्या. आता स्थिती निवळत असून मोठ्या प्रमाणात कंटेनर उपलब्ध झाल्याने हेच शुल्क कमी होऊन ३७५ डॉलर इतके कमी झाले आहे. परिणामी दुबईत आयात वस्तूंच्या किंमती साधारण १० ते १२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आगामी काळात प्रति कंटेनर शुल्क १५० ते १७५ डॉलर इतके कमी होण्याची शक्यता असल्याने किंमतीही २० टक्क्यांनी कमी होतील. ही स्थिती आखाती देशांतील अनिवासी भारतीयांप्रमाणेच अन्य ग्राहकांना दिलासा देणारी ठरेल.’

रुपया घसरला तरी खूपसा स्थिर

डॉ. दातार पुढे म्हणाले की, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत अल्प घसरला असला तरी खूपसा स्थिर आहे. पण चलनातील या घसरणीचाही फायदा परदेशात नोकरी करु इच्छिणाऱ्या भारतीयांना होऊ शकतो. कारण कुशल मनुष्यबळाची मागणी वाढल्यास अधिक उत्तम पॅकेजचे रोजगार प्राप्त करता येतात. एकूणच आव्हानात्मक स्थितीतही संधी असतात व भारताने अशा संधीचा फायदा घ्यायला हवा असं डॉ. दातार म्हणाले. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE)चे चलन दिऱ्हॅमसुद्धा भारत, पाकिस्तान, युके व युरोपीय देशांच्या चलनाच्या तुलनेत वधारले आहे. त्याचा परिणाम आगामी काळात दुबईतील आयात स्वस्त होण्यात होईल. भारत व पाकिस्तान हे देश संयुक्त अरब अमिरातीच्या अन्नधान्य तथा खाद्य उत्पादने आयातीचे प्रमुख स्रोत आहेत. भारत व पाकिस्तानातून येणारा तांदूळ, मसाले, सुकामेवा, भाज्या या संयुक्त अरब अमिरातीतील ग्राहकांमध्ये मोठी मागणी असते. यंदा अनुकूल हवामानामुळे किराणा उत्पादनांच्या निर्यातीत भारताला आघाडी घेण्याची संधी आहे. युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धस्थिती सध्या शांत असल्याने तेथून निर्यात सुरू झाली आहे. त्यामुळे खाद्यतेलांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे, असं दातार म्हणाले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग