इन्कम टॅक्स रिफंड हवा असेल तर लवकरात लवकर करा हे महत्त्वाचं काम, नाहीतर पैसे अडकणार-to get income tax refund do this work immediately or else you will not get it ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  इन्कम टॅक्स रिफंड हवा असेल तर लवकरात लवकर करा हे महत्त्वाचं काम, नाहीतर पैसे अडकणार

इन्कम टॅक्स रिफंड हवा असेल तर लवकरात लवकर करा हे महत्त्वाचं काम, नाहीतर पैसे अडकणार

Aug 05, 2024 10:21 AM IST

Income Tax Refund : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केलं की काम संपलं असं नाही. रिफंड मिळवायचा असेल तर ई-व्हेरिफिकेशनही तितकंच महत्त्वाचं असतं.

इन्कम टॅक्स रिफंड हवा असेल तर लवकरात लवकर करा हे महत्त्वाचं काम, नाहीतर फसाल!
इन्कम टॅक्स रिफंड हवा असेल तर लवकरात लवकर करा हे महत्त्वाचं काम, नाहीतर फसाल!

Income Tax Refund 2024 : प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याची मुदत संपल्यानंतर आता परतावा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देय करापेक्षा अधिक कर आधीच भरणाऱ्या करदात्यांना 'इन्कम टॅक्स रिफंड' मिळतो, मात्र त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात.

यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवरणपत्र भरल्यापासून ३० दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करावं लागतं. त्यानंतरच विभागाकडून परतावा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते. करदात्यानं ई-व्हेरिफिकेशन न केल्यास रिफंड मिळत नाही.

करदात्यानं आयटीआरची ई-पडताळणी केल्याच्या तारखेपासून परताव्याची प्रक्रिया सुरू होते. सर्वसाधारणपणे आयटीआरच्या स्वरूपानुसार पडताळणीच्या तारखेपासून पैसे मिळण्यास १५ दिवस ते २ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये परतावा त्याआधीही मिळू शकतो. रिटर्नमध्ये काही अनियमितता आढळल्यास परताव्याच्या प्रक्रियेला उशीर होऊ शकतो.

पोर्टलवर तपासू शकता रिफंड स्टेटस

अशा परिस्थितीत प्राप्तिकर विभाग सुधारित विवरणपत्र मागू शकतो. त्याची फेरतपासणी केली जाते आणि ते योग्य आढळले तरच परताव्याचे पैसे दिले जातात. करदाते आयकर विभागाच्या पोर्टलवर परताव्याची स्थिती देखील तपासू शकतात.

३० दिवसांत ई-व्हेरिफिकेशन बंधनकारक

इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार आयटीआर भरल्यानंतर ३० दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे. त्याची पडताळणी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे करता येते. ऑफलाइन पद्धतीनं आयटीआरची प्रत स्वाक्षरी करून पोस्टानं बेंगळुरू येथील आयकर विभागाच्या कार्यालयात पाठवावी लागते. जर करदात्यानं आयटीआरची पडताळणी केली नसेल तर त्याला परताव्याचे पैसे मिळणार नाहीत. इतकंच नाही तर त्याला विलंबानं आयटीआर भरावा लागणार असून त्यासाठी त्याला दंडही भरावा लागणार आहे.

कोणत्या आयटीआरसाठी किती वेळ?

आयटीआर-१ : या प्रकारचा आयटीआर भरला असले तर १० ते १५ दिवसांत रिफंड खात्यावर जमा होतो. फॉर्म १६ च्या आधारे विवरणपत्र भरणाऱ्यांसाठी ही मुदत आहे.

आयटीआर-२ : परतावा मिळण्यासाठी २० ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, काही वेळा विविध कारणांमुळे त्याला उशीर होतो.

आयटीआर-३ : दोन महिन्यांचा कालावधी लागतो. कारण या रिटर्न फॉर्ममध्ये बिझनेस इन्कमसह विविध माहितीचा समावेश असल्यानं त्याची बारकाईनं छाननी केली जाते.

विभाग