सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ‘गुंतवणुकीचे आकर्षक पर्याय’… किंवा ‘गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळवून देण्याचं आश्वासन देणाऱ्या असंख्य जाहिराती आसपास झळकलेल्या दिसतात. अशाच एका जाहिरातीला भुलून मुंबईतील एका तरुणाची तब्बल ९० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या तरुणाला आधी एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून घेतले गेले आणि त्यानंतर आकर्षक रिटर्न इव्हेस्टमेंटचे आमिष दाखवून ९० लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार घडला आहे.
प्राप्त माहितीनुसार मुंबईचा रहिवासी असलेल्या या तरुणाला सर्वप्रथम एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून घेतले गेले. हा व्हॉट्सॲप ग्रुप एका परदेशी तज्ज्ञाद्वारे चालवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. व्हॉट्सॲप ग्रुपवर आर्थिक गुंतवणूक कशी करावी, याच्या विविध टीप्स टाकण्यात आल्या होत्या. शिवाय परतावा कसा मिळवावा देण्याच्या ऑफर्स टाकण्यात आल्या.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲप ग्रुपची खात्री पटल्यावर पीडित तरुण या ग्रुपवर होणाऱ्या चर्चेत सामील झाला होता. त्यानंतर एका योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. तेव्हा घोटाळेबाजांनी त्याला ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध असलेल्या मोबाईल ॲपचा वापर करून त्याचे ट्रेडिंग खाते तयार करण्यास सांगितले. या तरुणाने ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याला पैसे ट्रान्सफर करण्याची सूचना देण्यात आली. ट्रेडिंग सुरू करण्यासाठी ब्रोकरच्या बँक खात्यात सुरूवातीला ९० लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. ९० लाख रुपये ट्रान्सफर केल्यानतंर तरुणाच्या खात्यात १५ कोटी ६९ लाख रुपयाची रक्कम दिसून आली. तथापि, जेव्हा पीडितेने खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा घोटाळेबाजांनी खात्यातील देवाणघेवाण बंद केली. या बदल्यात तरुणाकडे १० टक्के रकमेची, म्हणजे १ कोटी ४५ लाख रुपये, मागणी करण्यात आली होती. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले.
व्हॉट्सॲप ग्रुपवरील गुंतवणुकीच्या फसव्या जाहिरातींपासून कसे दूर रहाल?
१. अनावश्यक संदेशांपासून सावध रहा: अज्ञात स्त्रोतांकडून गुंतवणूकीच्या ऑफर प्राप्त करताना सावधगिरी बाळगा. प्रतिष्ठित गुंतवणूक कंपन्या सामान्यत: अवांछित संदेशांद्वारे संपर्क साधत नाहीत, हे लक्षात ठेवा.
२. योजना कोण राबवतोय त्याची ओळख पटवा: पैसे गुंतवण्यापूर्वी प्रेषकाच्या ओळखीची खात्री करा. खाते खरे की खोटे याची चौकशी करा
३. गुंतवणुकीचे पर्याय शोधा: अज्ञात योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळा. सखोल संशोधन करा आणि माहितीपूर्ण गुंतवणुकीचा निवड करण्यासाठी आर्थिक क्षेत्रातील तज्ञांशी सल्लामसलत करा.
४. दबावाखाली येऊन गुंतवणूक करू नका: घोटाळेबाज अनेकदा पीडितांना त्वरित निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी घाईघाईत निर्णय घेण्याचे सांगतात. जर तुम्हाला गुंतवणूक करतेवेळी काही दबाव वाटत असल्यास ते धोक्याचे समजा
५. हमी परताव्यापासून सावध रहा: सर्वच गुंतवणुकीत जोखीम सामावलेली असते. कोणतीही जोखीम न घेता खात्रीशीर परताव्याची आश्वासने ही फसवी असतात.
६. वैयक्तिक माहितीचे संरक्षण करा: असत्यापित व्यक्तींसोबत वैयक्तिक किंवा आर्थिक तपशील शेअर करू नका.
७. संशयास्पद वर्तवणुकीची तक्रार करा: तुम्हाला एखाद्या योजनेमध्ये घोटाळ्याचा संशय येत असल्यास त्याची व्हाट्सएपद्वारे संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरित तक्रार करा.