Share Market News in Marathi : विशिष्ट ब्रँडनेमच्या वापराच्या मुद्द्यावरून काही कंपन्यांविरोधात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं टिळकनगर इंडस्ट्रीज या मद्य कंपनीच्या शेअरला आज मोठा फटका बसला. कंपनीचे शेअर आज थेट २० टक्क्यांनी घसरून २९३.२० रुपयांपर्यंत घसरला.
'मॅन्सन हाऊस' आणि 'सॅव्हॉय क्लब' या ट्रेडमार्क ब्रँड नावांचा वापर करणाऱ्या काही कंपन्यांविरोधात टिळकनगर इंडस्ट्रीजनं याचिका दाखल केली होती. हर्मन जेनसेन बेव्हरेजेस नेदरलँड्स बी.व्ही. आणि इतर कंपन्यांनी त्यांच्या अल्कोहोलिक उत्पादनांमध्ये ही नावं वापरली होती. न्यायालयानं ही याचिका फेटाळताना अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्सला पश्चिम बंगालमध्ये 'मॅन्सन हाऊस' या नावानं उत्पादनं आणण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आव्हान याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयानं टिळकनगर इंडस्ट्रीजला मुदत देत या आदेशाला चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे.
टिळकनगर इंडस्ट्रीजनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, 'अंतर्गत मूल्यांकनानुसार कंपनीच्या व्यवसायावर कोणताही आर्थिक परिणाम झालेला नाही आणि कंपनी आपल्या हितांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक पावलं उचलत आहे.'
टिळकनगर इंडस्ट्रीजचा शेअर गेल्या ५ वर्षांत १४४४ टक्क्यांनी वधारला आहे. १४ फेब्रुवारी २०२० रोजी कंपनीचा शेअर १९ रुपयांवर होता, आज हा शेअर २९३.२० रुपयांवर बंद झाला. गेल्या चार वर्षांत मद्य कंपनीच्या शेअर्समध्ये ९६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स २७.५० रुपयांवरून २९३.४० रुपयांवर पोहोचले आहेत. टिळकनगर इंडस्ट्रीजच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ४५७.३० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १८२.६० रुपये आहे.
टिळकनगर इंडस्ट्रीज १९८३ पासून 'मॅन्सन हाऊस' आणि 'सॅव्हॉय क्लब' ट्रेडमार्कअंतर्गत व्हिस्की, जिन आणि ब्रँडीचे उत्पादन, विपणन आणि विक्री करीत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीने जाहीर केले होते की, 'मॅन्सन हाऊस' ब्रँडी हा देशातील सर्वात जास्त विकला जाणारा आणि जगभरात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड आहे.
संबंधित बातम्या