मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Fund SIP : महिना १० हजारच्या एसआयपीनं बनवलं करोडपती! पाहा वर्षाला किती झाली कमाई?

Mutual Fund SIP : महिना १० हजारच्या एसआयपीनं बनवलं करोडपती! पाहा वर्षाला किती झाली कमाई?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 25, 2024 03:13 PM IST

Mutual Fund SIP Investment : संयम आणि सातत्य ठेवून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास काय होऊ शकते, याचा प्रत्यय सध्या काही गुंतवणूकदारांना येत आहे.

१० हजारच्या एसआयपीनं बनवलं करोडपती! पाहा, दरवर्षी किती झाली कमाई
१० हजारच्या एसआयपीनं बनवलं करोडपती! पाहा, दरवर्षी किती झाली कमाई

Mutual Fund SIP Investment : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन आणि सातत्य याला अत्यंत महत्त्व असते. बाजार तज्ज्ञ व अनुभवी गुंतवणूकदारांकडूनही नेहमी तसा सल्ला दिला जातो. त्यामुळं अधिक नफा मिळण्याची शक्यता कैकपटीनं वाढते. असाच छप्परफाड नफा एका म्युच्युअल फंडानं नुकताच दिला आहे. या फंडात १० हजार रुपयांची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत.

चक्रवाढ नफ्याचा वार्षिक दर?

फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड १६ वर्षांपूर्वी जुलै २००७ मध्ये सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून हा फंड १४.३३ टक्के CAGR (Compound Annual Growth Rate) परतावा देण्यात यशस्वी झाला आहे. ही आकडेवारी केंद्रस्थानी ठेवून नफ्याची आकडेमोड केल्यास नफ्याची चक्रावून टाकणारी माहिती समोर येते. उदा. एखाद्या गुंतवणूकदारानं गेल्या एका वर्षात महिन्याला १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याचा परतावा १.४६ लाख रुपयांपर्यंत गेला असेल. गेल्या वर्षभरात या फंडानं तब्बल ३६.५५ टक्के परतावा दिला आहे.

१० वर्षात किती मिळाला परतावा?

फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी फंडानं दिलेल्या परताव्याचा हिशेब केल्यास आपल्याला ३, ५, १० आणि २० अशा वेगवेगळ्या वर्षांत गुंतवणूकदारांना झालेला नफा सहज काढता येतो. एखाद्या गुंतवणूकदारानं ३ वर्षांची एसआयपी घेतली असेल तर त्याला ३.६ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ४.९६ लाख रुपयांचा परतावा मिळाला असेल. त्याचप्रमाणे ५ वर्षांपासून गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला ६ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १०.२६ लाख रुपयांचा परतावा मिळाला असेल.

गुंतवणूकदार झाले कोट्यधीश

गेल्या १० वर्षांपासून या फंडात नियमितपणे १०,००० रुपये गुंतवणाऱ्या व्यक्तीला १२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ३६.४७ लाख रुपयांचा परतावा मिळाला असेल. तर, ज्या गुंतवणूकदारांनी सलग २० वर्षे या फंडावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली आहे, त्यांना आतापर्यंत २० लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर एकूण ९७.५८ लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे.

 

(डिस्क्लेमर: ही केवळ म्युच्युअल फंडाच्या कामगिरीची माहिती आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

WhatsApp channel