'या' आहेत देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या! गुंतवणूकदारांनाही केलं मालामाल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  'या' आहेत देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या! गुंतवणूकदारांनाही केलं मालामाल

'या' आहेत देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या! गुंतवणूकदारांनाही केलं मालामाल

Updated Jun 29, 2024 11:50 AM IST

Highest Profit making companies : सरत्या आर्थिक वर्षात निफ्टी-५० मधील काही कंपन्यांनी जोरदार कमाई केली आहे. कोणत्या आहेत या कंपन्या? पाहूया…

'या' आहेत देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या! गुंतवणूकदारांनाही करतात मालामाल
'या' आहेत देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या! गुंतवणूकदारांनाही करतात मालामाल

Highest Profit making companies : मागील २०२३-२४ हे आर्थिक वर्ष भारतीय कंपन्यांसाठी खूप चांगलं आहे. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, या आर्थिक वर्षामध्ये निफ्टी ५० कंपन्यांचा एकूण नफा ८.१४ लाख कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वी हाच नफ्याचा आकडा ६.३९ लाख कोटी रुपये होता. म्हणजेच वार्षिक आधारावर नफ्यात २७ टक्के वाढ झाली आहे.

निफ्टी ५० मधील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत आणि त्यांची कामगिरी कशी राहिली आहे? जाणून घेऊया…

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी ७८,६३३ कोटी रुपयांच्या नफ्यासह सर्वात फायदेशीर कंपनी ठरली. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया नफ्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. बँकेचा एकूण नफा ६८,१३८ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही रक्कम २० टक्के अधिक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरच्या किमती गेल्या १२ महिन्यांत ४९ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

एचडीएफसी (HDFC)

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीला एकूण ६५,४६६ कोटी रुपये नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. गेल्या १२ महिन्यांत स्टॉकच्या किमतीत केवळ २ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे.

ओएनजीसी (ONGC)

या सरकारी कंपनीच्या नफ्यात ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये या सरकारी कंपनीचा नफा ५४,७०५ कोटी रुपये होता. शेअर बाजारातही कंपनीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. गेल्या १२ महिन्यांत या PSU स्टॉकची किंमत तब्बल ७० टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचं मार्केट कॅप १४.२३ लाख कोटी रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.)

Whats_app_banner