Stocks to Buy : भारतीय शेअर बाजाराचे पहिल्या तिमाहीचे निकाल आतापर्यंत संमिश्र राहिले आहेत. त्यामुळं आधीच तेजीत असलेल्या भारतीय शेअर बाजारावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. निफ्टीनं २० जुलैला पहिल्यांदाच २५ हजारांचा टप्पा पार केला खरा, पण ती पातळी टिकवता आली नाही. आज पुन्हा निफ्टी आणि सेन्सेक्स वरच्या दिशेनं झेपावत आहे.
बाजाराचं मूल्यांकन हा सध्या चिंतेचा विषय असला तरी किरकोळ गुंतवणूकदारांच्या उत्साही सहभागामुळं शेअर बाजार स्थिर राहील, असं तज्ज्ञांचं मत आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार उच्च-गुणवत्तेच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. हे बाजारासाठी चांगलं लक्षण आहे, असं जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितलं.
अनेक ब्रोकरेज कंपन्यांच्या शिफारशींच्या आधारे येत्या वर्षभरात १२ ते १७ टक्क्यांनी वाढू शकणाऱ्या सहा समभागांची यादी इथं देत आहोत.
बीईएलचे आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. त्यामुळं हा शेअर पुढंही मजबूत वाटचाल करेल, असा विश्वास मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसला आहे. हा शेअर सध्या ३१९.८५ रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यात १२ टक्के वाढीची अपेक्षा असून तो ३६० पर्यंत जाऊ शकतो.
झेन टेक्नॉलजीजचा शेअर सध्या १६७५ रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर १८२० रुपयांवर जाऊ शकतो असा अंदाज आहे. या शेअरवर मोतीलालनं आधी १७७५ हे टार्गेट ठेवलं होतं, ते आता वाढवलं आहे.
आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत एनटीपीसीचे उत्पन्न ४८,५०० कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर हे उत्पन्न १३ टक्क्यांनी आणि तिमाही दर तिमाही आधारावर २ टक्क्यांनी वाढलं आहे. जेएम फायनान्शिअल्सच्या अंदाजापेक्षा हे उत्पन्न अधिक आहे. या पार्श्वभूमीवर ब्रोकरेजला या शेअरच्या बाबतीत आशा आहे. सध्या एनटीपीसीचा शेअर ४०४.८० रुपये आहे. तो ४५१ पर्यंत वाढू शकतो, असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.
जेएम फायनान्शिअलच्या म्हणण्यानुसार, चोलामंडलमच्या व्यवस्थापनानं नवीन व्यवसायांमध्ये ऑपरेशनल खर्च कमी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर चांगल्या मान्सूनमुळं चांगल्या वसुलीमुळं दुसऱ्या सहामाहीत पतपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं व्यवसाय विस्तारास गती मिळेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर चोलामंडलमच्या शेअर वाढण्याची शक्यता आहे. हा शेअर सध्या १४२३ च्या आसपास आहे. तो १,६५० रुपयांवर जाईल असा अंदाज आहे.
अरविंद लिमिटेडचा शेअर सध्या ३७७ च्या आसपास आहे. या शेअरमध्ये १५ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून तो ४३१ वर जाईल, असा अंदाज नुवामा वेल्थ मॅनेजमेंटनं व्यक्त केला आहे.
कोलगेट पामोलिव्ह इंडियाचा आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीतील महसूल, एबिटडा आणि करोत्तर नफा (PAT) अनुक्रमे १३ टक्के, २२ टक्के आणि २४ टक्क्यांनी वाढला आहे. येत्या काळातही कंपनीची कामगिरी उत्तम राहील अशी अपेक्षा आहे. हा शेअर सध्या ३३९०.७५ रुपयांवर ट्रेड करत आहे तो ३७४५ वर जाईल, असा नुवामाचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या