Bonus Shares : 'या' तीन कंपन्या देतायत बोनस शेअर्स; लाभ घेण्याची आज शेवटची संधी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bonus Shares : 'या' तीन कंपन्या देतायत बोनस शेअर्स; लाभ घेण्याची आज शेवटची संधी

Bonus Shares : 'या' तीन कंपन्या देतायत बोनस शेअर्स; लाभ घेण्याची आज शेवटची संधी

Jan 03, 2025 11:27 AM IST

Bonus Share News in Marathi : केपीआय ग्रीन एनर्जी, सिनिक एक्सपोर्ट्स इंडिया आणि गरवारे टेक्निकल फायबर्स या तीन कंपन्यांच्या बोनस शेअर्सचा लाभ घेण्याची आज शेवटची संधी आहे.

Bonus Shares : 'या' तीन कंपन्या देतायत बोनस शेअर्स; लाभ घेण्याची आज शेवटची संधी
Bonus Shares : 'या' तीन कंपन्या देतायत बोनस शेअर्स; लाभ घेण्याची आज शेवटची संधी

Stock Market News in Marathi :  शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची नव्या वर्षाची सुरुवात विविध कंपन्यांच्या बोनस शेअर्सनं झाली आहे. अलीकडंच तीन कंपन्यांनी बोनस शेअर्सची घोषणा केली असून त्यासाठीची रेकॉर्ड डेट ३ जानेवारी २०२५ म्हणजेच, आज आहे. याचा अर्थ बोनस शेअर्सचा लाभ घेण्याची आज शेवटची संधी आहे.

केपीआय ग्रीन एनर्जी, सिनिक एक्सपोर्ट्स इंडिया आणि गरवारे टेक्निकल फायबर्स या कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहेत. हे शेअर्स आज एक्स-बोनस ट्रेड करत आहेत. केपीआय ग्रीन एनर्जीनं नुकतीच १:२ या प्रमाणात बोनस देण्याची घोषणा केली. म्हणजेच शेअरहोल्डर्सना प्रत्येक दोन इक्विटी शेअर्समागे एक बोनस इक्विटी शेअर मिळेल.

जेम्स अँड ज्वेलरी कंपनी सेनिक एक्सपोर्ट्स इंडिया शेअरहोल्डर्सना प्रत्येक पाच समभागांमागे एक शेअर देणार आहे. गरवारे टेक्निकलनं ४:१ या प्रमाणात बोनस देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच शेअरहोल्डर्सना त्यांच्याकडं असलेल्या प्रत्येक शेअरमागे ४ शेअर मिळणार आहेत.

कशी आहे शेअर्सची कामगिरी?

बीएसईवर शुक्रवारी, ३ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात हे तिन्ही शेअर्स संमिश्र व्यवहार करत होते. बीएसईवर सेनिक एक्सपोर्ट्सचा शेअर १२२६.४० रुपयांवर उघडला आणि शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. सकाळी दहाच्या सुमारास तो सुमारे ४ टक्क्यांनी वधारून १,२१४.५० रुपयांवर व्यवहार करत होता.

गरवारे टेक्निकल फायबर्सच्या शेअरचा भाव ९२९.१५ रुपयांच्या बंदच्या तुलनेत ९६२.९५ रुपयांवर खुला झाला आणि तो ४ टक्क्यांनी घसरून ८९१ रुपयांवर आला. सकाळी दहाच्या सुमारास तो ३.३५ टक्क्यांनी घसरून ८९९.५० रुपयांवर होता.

केपीआय ग्रीनच्या शेअरमध्येही घसरण झाली. शुक्रवारी बीएसईवर ५७२.४० रुपयांच्या तुलनेत ५८३.६० रुपयांवर उघडला आणि २ टक्क्यांनी घसरून ५५८.६० रुपयांवर बंद झाला. मात्र, सकाळी १० वाजता एक टक्का घसरून ५६६ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता.

बोनस शेअर म्हणजे काय?

बोनस शेअर्स हे कंपनीकडून आपल्या शेअरहोल्डर्सना विनामूल्य दिले जातात. हे शेअर्स कंपनीच्या संचालक मंडळानं निश्चित केलेल्या प्रमाणात दिले जातात. उदा. १:१, १:२ किंवा २:३ असं कोणतंही प्रमाण असू शकतं. कंपनीचा स्टॉक किंवा सरप्लस रिडीम करून बोनस शेअर्स दिले जातात.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner