Defence Stocks : गेल्या काही महिन्यांपासून संरक्षण क्षेत्रातील शेअर्स मरगळलेले दिसत आहेत. मात्र, या क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गननं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्सच्या वाढीबद्दल आशावाद दर्शवला आहे. तसंच, टार्गेट प्राइस देखील शेअर केली आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर ४१९३.३५ रुपयांवर उघडला. काही काळानंतर बीएसईवर ६ टक्के उसळी घेतल्यानंतर कंपनीच्या शेअरचा भाव ४४४४ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. ईटी नाऊच्या रिपोर्टनुसार, ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गननं न्यूट्रल रेटिंग दिलं आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ५,८५९.९५ रुपये आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १७९७.१० रुपये आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा (BEL) समभाग सुमारे ३ टक्क्यांनी वधारला असून आज २९४.३० रुपयांच्या पातळीवर उघडला. दिवसभरातील कंपनीचा उच्चांक सुमारे तीन टक्क्यांनी वधारून ३०१ रुपयांवर पोहोचला. जेपी मॉर्गननं ३४० रुपयांचं टार्गेट प्राइस ठेवलं आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३४०.३५ रुपये आहे आणि कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १४०.४५ रुपये आहे. गेल्या वर्षभरात या डिफेन्स स्टॉकच्या किमतीत १११ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटडेच्या शेअरच्या किमतीतही आज जवळपास ३ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊसनं कंपनीसाठी ५१३५ रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ९४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.