share market news : या १४ कंपन्यांनी केलं गुंतवणूकदारांना मालामाल, तुमच्याकडं आहेत का हे शेअर?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  share market news : या १४ कंपन्यांनी केलं गुंतवणूकदारांना मालामाल, तुमच्याकडं आहेत का हे शेअर?

share market news : या १४ कंपन्यांनी केलं गुंतवणूकदारांना मालामाल, तुमच्याकडं आहेत का हे शेअर?

Mar 25, 2024 05:39 PM IST

Stock Market in ten years : मागील दहा वर्षांत शेअर बाजारातील काही कंपन्यांनी केलेल्या दमदार कामगिरीचा गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा झाला आहे.

'या' १४ कंपन्यांनी केलं गुंतवणूकदारांना मालामाल, तुमच्याकडं आहेत का हे शेअर?
'या' १४ कंपन्यांनी केलं गुंतवणूकदारांना मालामाल, तुमच्याकडं आहेत का हे शेअर?

share market journey in last 10 years : मागच्या दहा वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत अनेक बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठी प्रगती झाली आहे. २०१४ मध्ये दहाव्या स्थानी असलेली भारताची अर्थव्यवस्था आता पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.४ टक्के होता. या दशकात शेअर बाजारात १४ कंपन्यांनी जवळपास ४००० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

निफ्टी-५० आणि सेन्सेक्समध्ये किती वाढ?

१० वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ मध्ये होळीच्या दिवशी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (Nifty) ६४९४ वर होता. यंदाच्या होळीच्या दिवशी तो २२,०९६ अंकांवर पोहोचला आहे. म्हणजेच या काळात निफ्टीमध्ये २४० टक्क्यांची वाढ झाली आहे. निफ्टीच्या एकूण कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास हा निर्देशांक मागच्या १० वर्षांपैकी ८ वर्षे तेजीत होता. २०१५ मध्ये निफ्टीमध्ये ४.०६ टक्क्यांची घसरण दिसून आली. दुसरीकडं गेल्या १० वर्षात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (Sensex) २३० टक्क्यांनी झेप घेतली आहे.

कोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ?

२०१४ ते २०२४ पर्यंत निफ्टी-५० प्लॅटफॉर्मवरील ४७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये नेत्रदीपक वाढ झाली. त्यापैकी १४ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. या १४ कंपन्यांचा परतावा ५०० टक्क्यांपासून ३९०० टक्क्यांपर्यंत होता. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्हचे समभाग अनुक्रमे ३९१३ टक्के आणि २१०३ टक्क्यांनी वाढले.

त्याच वेळी टाटा समूहातील टायटनचे समभाग १३५३ टक्क्यांनी वाढले. या वर्षांत ब्रिटानियाचे शेअर्स १०२९ टक्क्यांनी वाढले आहेत. अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्सच्या किमती अनुक्रमे ८५६ टक्के आणि ७३७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे शेअर ७०० टक्क्यांनी वाढले आहेत. अपोलो हॉस्पिटल्स, अदानी पोर्ट्स, एलटीआय माइंडट्री, आयशर मोटर्स, मारुती सुझुकी इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपीसीएलचे शेअर्स ५०० ते ६०० टक्क्यांनी वाढले आहेत.

 

(डिसक्लेमर: ही केवळ कंपन्यांच्या शेअर बाजारातील कामगिरीची माहिती आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून घ्यावा.)

Whats_app_banner