TCS Q3 Results : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (टीसीएस) गुंतवणूकदारांना डबल गिफ्ट दिलं आहे. कंपनीनं तिसऱ्या तिमाहीचा निकाल येताच डबल डिविडंडची घोषणा केली आहे.
स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं १० रुपये प्रति इक्विटी समभाग अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. त्याचबरोबर, प्रत्येकी १ रुपये अंकित मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरवर ६६ रुपये विशेष लाभांश जाहीर केला आहे.
टीसीएसच्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत डिविडंड बाबत झालेल्या निर्णयांची माहिती बीएसईला दिली. त्यानुसार, टीसीएसच्या शेअरहोल्डर्सना एका शेअरमागे (१०+६६) ७६ रुपये लाभांश मिळणार आहे. हे दोन्ही लाभांश सोमवार, ३ फेब्रुवारी २०२५ रोजी शेअरहोल्डर्सच्या खात्यात जमा होतील, अशी माहितीही कंपनीनं दिली आहे.
टीसीएसनं डिव्हिडंड जाहीर करताना रेकॉर्ड डेटचीही घोषणा केली आहे. त्यानुसार, १७ जानेवारी ही रेकॉर्ड डेट असेल. या तारखेला ज्यांची नावं कंपनीच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीच्या रेकॉर्डमध्ये असतील त्यांना डिविडंडचा लाभ मिळेल.
टीसीएसचा शेअर गुरुवारी १.७२ टक्क्यांनी घसरून ४,०३६.६५ रुपयांवर बंद झाला. कंपनीनं गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा निव्वळ नफा १२ टक्क्यांनी वाढून १२,३८० कोटी रुपये झाला आहे. तिसऱ्या तिमाहीत परिचालनातून मिळणारं उत्पन्न पाच टक्क्यांनी वाढून ६३,९७३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा ६०,५८३ कोटी रुपये होता.
टीसीएसच्या कम्युनिकेशन, मीडिया आणि टेक्नॉलॉजी सेगमेंटचा महसूल २० टक्क्यांनी वाढून ११,९८९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा ९,९३२ कोटी रुपये होता.
कंपनीच्या मुख्य व्यवसाय विभागातील म्हणजेच बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस व इन्शुरन्स (BFSI) सेक्टरमधून येणारा महसूल २३,४८१ कोटी रुपयांवर पोहोचला. मागील तिमाहीतील २२,६६७ कोटी रुपयांशी तुलना करता ही वाढ ३.६ टक्क्यांनी जास्त आहे.
संबंधित बातम्या