Stock Market Updates : देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) जून तिमाहीचे निकाल जाहीर करतानाच गुंतवणूकदारांना खूष करून टाकलं आहे. टीसीएसनं प्रत्येक शेअरमागे १० रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. पात्र भागधारकांना ५ ऑगस्ट रोजी अंतरिम लाभांश दिला जाईल. भागधारकांची पात्रता तपासण्याची रेकॉर्ड डेट २० जुलै ही निश्चित करण्यात आली आहे.
टीसीएसने शेअर बाजाराला (stock exchange) या संदर्भात माहिती दिली आहे. गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांनी कंपनीच्या प्रत्येकी १ रुपयांच्या समभागामागे १० रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
टीसीएसनं गुरुवार, ११ जुलै रोजी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. आयटी सेवा क्षेत्रातील या दिग्गज कंपनीचा निव्वळ नफा २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढून १२,०४० कोटी रुपये झाला आहे. २०२४-२५ च्या एप्रिल ते जून या तिमाहीत मुख्य व्यवसायातून मिळालेला महसूल मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ५.४ टक्क्यांनी वाढून ६२,६१३ कोटी रुपये झाला आहे.
सर्व उद्योग आणि बाजारपेठांमध्ये चौफेर वाढीसह नवीन आर्थिक वर्षाची दमदार सुरुवात करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमचा क्लायंट बेस सतत विस्तारत आहोत. उदयोन्मुख तंत्रज्ञानात नवीन क्षमता निर्माण करत आहोत आणि फ्रान्समध्ये नवीन एआय-केंद्रित टीसीएस पेसपोर, अमेरिकेत आयओटी प्रयोगशाळा आणि लॅटिन अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये आमच्या वितरण केंद्रांचा विस्तार करत आहोत,' असं टीसीएसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन यांनी सांगितलं.
टीसीएसचा शेअर गुरुवारी, ११ जुलै रोजी ०.३३ टक्क्यांनी वधारून ३,९२२.७० रुपयांवर बंद झाला. बाजार बंद झाल्यानंतर पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले. तसंच, लाभांशही जाहीर करण्यात आला. त्याचं प्रतिबिंब आज बाजारात उमटलं आहे. टीसीएसचा शेअर एनएसईवर आज पावणे सात टक्क्यांनी वाढून ४१७८ रुपयांवर पोहोचला आहे.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज शेअर बाजार तेजीत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १७८ आणि ५९० अंकांनी वधारलेले आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ हिरवेगार झाले आहेत.
संबंधित बातम्या