मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market Update: टाटाच्या 'या' कंपनीला मोठा झटका; ८० टक्के तोटा, शेअरचा भाव गडगडला!

Stock Market Update: टाटाच्या 'या' कंपनीला मोठा झटका; ८० टक्के तोटा, शेअरचा भाव गडगडला!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 01, 2022 04:38 PM IST

Tata Steel Share Price: सप्टेंबर अखेरच्या तिमाहीचे निकाल येताच टाटा समूहाच्या टाटा स्टील कंपनीच्या शेअरचा भाव गडगडला आहे.

Tata Steel
Tata Steel

Tata Steel Share Price: मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजीचं वातावरण आहे. या उत्साही वातावरणावर स्वार होत अनेक कंपन्यांचे शेअर नवनवे उच्चांक गाठत असताना टाटा स्टीलचे शेअर्स मंगळवारी तीन टक्क्यांनी घसरले आहेत. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीचे निकालाचा हा परिणाम असल्याचं दिसत आहे.

मागील वर्षाशी तुलना करता टाटा स्टीलला विविध पातळ्यांवर फटका बसला आहे. एकीकडं कंपनीचं एकूण उत्पन्न कमी झालं आहे, तर दुसरीकडं खर्चाचा आकडाही फुगला आहे. या साऱ्याचा एकत्रित परिणाम सप्टेंबरच्या तिमाहीच्या नफ्यावर झाला आहे. 

अशी आहे आकडेवारी

नुकत्याच संपलेल्या तिमाहीत टाटा स्टीलचा एकत्रित नफा ९० टक्क्यांनी घसरून १,२९७ कोटी रुपयांवर आला आहे. टाटा समूहाच्या कंपनीनं गेल्या वर्षी याच तिमाहीत १२,५४७.७० कोटी रुपयांचा नफा कमावला होता. सप्टेंबरच्या तिमाहीत टाटा स्टीलचं एकूण उत्पन्न ६०,२०६.७८ कोटी रुपये इतकं होतं. मागील वर्षी याच कालावधीत ते ६०,६५७.९८ कोटी रुपये होतं. या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च वाढून तो ५७,६८४.०९ कोटींवर गेला आहे. मागील आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत हाच खर्च ४७,२३९.६३ कोटी रुपये होता.

टाटा स्टीलचा शेअर आज सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात बीएसईवर ३.३४ टक्क्यांनी घसरून ९८.१५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला होता. नंतर तो सावरून पुन्हा शंभरच्या वर गेला आहे. गेल्या काही काळात हा शेअर १३ टक्क्यांनी घसरला आहे. मागच्या सहा महिन्यांत हा शेअर जवळजवळ २६ टक्क्यांनी घसरला आहे. 

टाटा स्टीलचा शेअर घसरत असल्यानं गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अशा गुंतवणूकदारांना ब्रोकरेज फर्मनी घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. ९५ रुपयांचा स्टॉप लॉस ध्यानात घेऊन गुंतवणूकदारांनी शेअर होल्ड करावा, असं काही ब्रोकरेज फर्मनं म्हटलं आहे.

(टीप: संबंधित वृत्त हे कंपनीच्या शेअर बाजारातील कामगिरीवर आधारीत आहे. हा कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा निर्णय आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग