Tata Punch EV Launching News : टाटा मोटर्सनं एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये आपल्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कारचं अनावरण केलं आहे. ‘पंच’ असं या कारचं सोप्पं आणि सुटसुटीत नाव आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत अवघी १०.९९ लाख रुपये आहे. टाटा पंचमध्ये बॅटरी पॅकचे दोन पर्याय असून एकदा चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल ४२१ किमीचा प्रवास करू शकते.
टाटा मोटर्सनं पंच कारला आपल्या इलेक्ट्रिक कारच्या पोर्टफोलिओमध्ये Nexon EV च्या खालचं व Tiago EV च्या वरचं स्थान दिलं आहे. कारची प्रत्यक्ष डिलिव्हरी २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पंच ईव्हीची स्पर्धा Citroen eC3 आणि आगामी Hyundai Xcent EV शी असेल.
टाटा पंच ईव्हीची रचना टाटाच्या Nexon कारशी मिळतीजुळती आहे. नेक्सॉन फेसलिफ्ट प्रमाणे या कारमध्ये देखील एलईडी लाइट बार आहे. कारच्या बाह्य अवतारातील फीचर्समध्ये फ्रंट बम्परमध्ये एकत्रित केलेले स्प्लिट एलईडी हेडलाइट्स, उभ्या स्ट्रोकसह पुन्हा डिझाइन केलेले लोअर बंपर आणि सिल्व्हर फॉक्स स्किड प्लेट यांचा समावेश आहे.
कारच्या मागील बाजूस त्याच्या ICE मॉडेलप्रमाणे टेललाइट डिझाइन आहे. यात वाय आकाराच्या ब्रेक लाइट्स, रूफ-माउंटेड स्पॉयलर आणि बंपर डिझाइनचा समावेश आहे. साइड प्रोफाइलमध्ये आता १६ इंच डायमंड-कट अलॉय व्हील आणि सर्व चाकांवर डिस्क ब्रेक समाविष्ट आहेत.
टाटा पंच ईव्हीचं वैशिष्ट्य म्हणजे ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांत उपलब्ध आहे. यात २५ किलोवॅट आणि ३५ किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकचा समावेश आहे. याशिवाय चार्जिंगचेही दोन पर्याय कंपनीनं दिले आहेत. यात ७.२ kW फास्ट होम चार्जर (LR प्रकारासाठी) आणि ३.३ kW वॉलबॉक्स चार्जरचा समावेश आहे. २५ किलोवॅट बॅटरी पॅकची प्रमाणित श्रेणी ४२१ किमी आहे. तर ३५ किलोवॅट बॅटरी पॅकची प्रमाणित श्रेणी ३१५ किमी आहे.
पंच ईव्ही ही कार acti.ev या डेडिकेटेड इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. यात बोनेटच्या खाली १४ लिटर फ्रंक (पुढील ट्रंक) देखील समाविष्ट आहे. पंचमध्ये ड्युअल-टोन इंटीरियर थीम, प्रीमियम फिनिशसह ताजे सीट अपहोल्स्ट्री, टाटा लोगोसह टू-स्पोक स्टिअरिंग व्हील आणि मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळते. सुरक्षेच्या दृष्टीनं पंच कारमध्ये ६ एअरबॅग्ज, ABS, ESC, ESP, क्रूझ कंट्रोल आणि ३६० डिग्री कॅमेरा या अद्ययावत व दर्जेदार सुविधा आहेत.
टाटा पंचमधील इन्फोटेनमेंट स्क्रीन १०.२५ इंची आहे. यात १०.२५ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एक मोठे टू-स्पोक स्टीयरिंग व्हील देखील आहे. ही कार कोणत्याही ५० किलोवॅट DC फास्ट चार्जरने ५६ मिनिटांत १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. कारमधील बॅटरी वॉटर प्रूफ असून तिची वारंटी ८ वर्षे किंवा १,६०,००० किमीची आहे. एकूण ५ ड्युअल-टोन कलर पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असेल.