Tata Power Share Price : मागच्या जवळपास वर्षभरापासून तेजीच्या लाटेवर स्वार झालेला व जवळपास ७७ टक्के परतावा देणारा टाटा समूहातील टाटा पॉवरचा शेअर गेल्या चार दिवसांपासून सतत घसरत आहे. आजही हा शेअर जवळपास ८ टक्क्यांनी घसरल्यानं गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.
चार दिवसांपूर्वी टाटा पॉवरच्या शेअरनं ४०० चा टप्पा ओलांडत उच्चांक गाठला होता. त्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याचं दिसत आहे. त्याचा परिणाम शेअरच्या भावावर दिसून आला आहे. त्यामुळं ८ फेब्रुवारी रोजी ४०९ रुपयांवर असलेला हा शेअर आज ४६१ रुपयांपर्यंत खाली आला आहे.
याआधी गेल्या शुक्रवारी टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांची घसरण झाली होती. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे १० टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअर्समध्ये ही घसरण डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर दिसून येत आहे. वास्तविक, डिसेंबरची तिमाही टाटा पॉवरसाठी काही खास नव्हती. कंपनीच्या नफ्यात अपेक्षेनुसार वाढ झाली नाही. कंपनीचा नफा केवळ दोन टक्क्यांनी वाढला आणि तो १,०७६ कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा १,०५२ कोटी रुपये होता.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न वाढून १४,८४१ कोटी रुपये झालं आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हे उत्पन्न १४,३३९ कोटी रुपये होतं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (एप्रिल-डिसेंबर २०२३) कंपनीचा नफा वाढून ३,२३५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत हा नफा २,८७१ कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत कंपनीचं उत्पन्न वाढून ४५,२८६ कोटी रुपये झालं आहे. या कालावधीतील हा सर्वाधिक आकडा आहे. अक्षय ऊर्जा व्यवसायात ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत टाटा पॉवरची क्षमता ४,२७० मेगावॅटची आहे. या क्षमतेनुसार टाटा पॉवर ६०३.१ कोटी युनिट हरित ऊर्जेची निर्मिती करते.
मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या प्रॉफिट बुकींगनंतर आजही टाटाचे शेअर्स घसरले. ही घसरण यापुढंही कायम राहू शकते. वास्तविक, नुवामानं टाटा पॉवरचं रेटिंग कमी करून या शेअरची नवी टार्गेट प्राइस ३०३ रुपये अशी निश्चित केली आहे. म्हणजे शेअरच्या किंमतीत आणखी २३ टक्के घट होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कोळशाच्या पुरवठ्यातील तुटवडा लक्षात घेता टाटा पॉवरची वाढ मंदावण्याची शक्यता नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं व्यक्त केली आहे. रिन्यूएबल एनर्जीतील वाढत्या योगदानाची भरपाई करण्यासाठी दोन-तीन वर्षे लागतील अशी अपेक्षा आहे. अँटिक ब्रोकिंगनं वेगळं मत नोंदवलं आहे. टाटाच्या शेअरची किंमत वाढेल, असं अँटिक ब्रोकिंगनं म्हटलं आहे. टाटा पॉवरचा शेअर ४५० रुपयांपर्यंत जाईल, असं ब्रोकरेजनं म्हटलं आहे.
टाटा पॉवरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४१२.७५ रुपये आहे आणि ५२ आठवड्यांचा निचांक १८२.४५ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप १,१७,६८४.३६ कोटी रुपये आहे. टाटा पॉवरचा स्टॉक एका वर्षात ८० टक्के आणि तीन महिन्यांत ५५ टक्के वाढला आहे. तांत्रिकदृष्ट्या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) ८३.७ वर आहे. याचाच अर्थ हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये व्यवहार करत आहे.
(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या