Tata Motors Share Price today : रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार आज सकारात्मक दिसत असताना टाटा मोटर्सचे शेअरही आज कमालीचे वधारले. आज हा शेअर साडेतीन टक्क्यांनी वधारून १,११२.९० रुपयांवर पोहोचला. या वाढीनंतर आता हा शेअर आणखी खरेदी करावा की विकावा अशा संभ्रमात गुंतवणूकदार सापडले आहेत.
टाटा मोटर्सनं विद्यमान शेअरहोल्डर्सचे अधिकार कायम ठेवत भांडवल उभारणीसाठी डिफरन्शियल व्होटिंग राइट्स (डीव्हीआर) शेअर्स बाजारात आणले होते. हे विशिष्ट प्रकारचे शेअर्स असून ते शेअरहोल्डर्सला वेगवेगळे मताधिकार देतात. या शेअर्सचं ट्रेडिंग बंद होणार असल्याचं कंपनीनं आज मार्केट बंद झाल्यानंतर जाहीर केलं. २००८ पासून सूचीबद्ध असलेले डीव्हीआर शेअर्स रद्द करून त्याजागी सामान्य शेअर्स आणण्याचा कंपनीचा मानस आहे. १० डीव्हीआर शेअर्स असलेल्या गुंतवणूकदारांना बदल्यात ७ साधारण शेअर्स मिळतील. यासाठी कंपनीनं १ सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
टाटा मोटर्सचा शेअर आज इंट्राडेच्या उच्चांकी पातळीवर १,१३७ रुपयांवर गेला होता. गेल्या दोन वर्षांत टाटा मोटर्सच्या डीव्हीआर समभागांनी २२३.६ टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये ८६.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवाय गेल्या सहा आणि तीन महिन्यांत या शेअरनं गुंतवणूकदारांना प्रत्येकी १७ टक्के परतावा दिला आहे.
ब्रोकरेज फर्म चॉइस ब्रोकिंगनं टाटा मोटर्सच्या शेअरला १,२०५ ते १,२६० रुपयांच्या टार्गेट प्राइससह 'बाय' रेटिंग दिलं आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) सध्या ५७.८ वर आहे. ज्यामुळं किंमतीच्या वाढीचा वेग आणि खरेदीचा वेग वाढतो आहे. या तांत्रिक निर्देशांकांच्या आधारे १०९५ रुपयांच्या पातळीच्या आसपास खरेदीच्या संधींचा विचार करणं हे एक विवेकी धोरण असेल, असं चॉइस ब्रेकिंगनं म्हटलं आहे.
तांत्रिक विश्लेषण आणि सध्याची बाजारपेठेची परिस्थिती पाहता १२६० रुपये किंमतीचं उद्दिष्टं ठेवणाऱ्यांसाठी खरेदीची आशादायक संधी आहे. बाजारातील संभाव्य चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी विवेकीनं निर्णय घेणं आवश्यक आहे, असंही ब्रोकरेज फर्मनं म्हटलं आहे.