१२ मार्च १९९३ रोजी मुंबई शहरात १२ ठिकाणी भीषण बॉम्बस्फोट झाले होते. यात २५७ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. यातील एक बॉम्बस्फोट वांद्रे- पश्चिमेला समुद्रकिनारी असलेल्या ‘सी-रॉक’ या पंचतारांकीत हॉटेलमध्ये झाला होता. स्फोटानंतर अद्याप बंद पडून असलेले हे हॉटेल ताज समूहाने नुकतेच विकत घेतले आहे. येथील २ एकर जागेवर 'ताज बॅण्डस्टॅण्ड हे ३३० खोल्या असलेल्या नवीन हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. नव्या हॉटेलचा भूमिपूजन समारंभ आज, सोमवारी पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन उपस्थित होते.
नव्या 'ताज बॅण्डस्टॅण्ड' हॉटेलममुळे मुंबई शहराची स्कायलाइन बदलणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन समारंभात सांगितलं. पूर्वी मुंबई शहर हे विविध मेळावे, परिषदा यांची राजधानी म्हणून देशात प्रसिद्ध होते. मुंबईने गतवैभव प्राप्त केले असल्यााचे फडणवीस म्हणाले.
टाटा ग्रूपची हॉटेल विभाग हाताळणारी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL)चे व्यवस्थापकीय संचालक पुनीत चटवाल म्हणाले, ‘आयएचसीएलने १९०३ साली मुंबईत ताजमहाल पॅलेस हे पहिले हॉटेल सुरू केले. आता एक शतकाहून अधिकचा काळ लोटला असून मुंबईच्या सांस्कृतिक परंपरेत कंपनी एकप्रकारे मिसळून गेली आहे. वांद्रे पश्चिम येथे उभारण्यात येणारे ‘ताज बॅण्डस्टॅण्ड’ हे नवीन हॉटेल या वारशाची साक्ष देणारे ठरणार असून येणाऱ्या शतकासाठी आमच्या आयकॉनिक ब्रॅण्डचा मशालवाहक ठरणार आहे. मुंबईच्या स्कायलाईनमधली एक ठळक, महत्वाची इमारत म्हणून ‘ताज बॅण्डस्टॅण्ड’ ओळखले जाणार आहे.’ असं चटवाल म्हणाले.
वांद्रे पश्चिम येथील वांद्रे बॅण्डस्टॅण्ड भागात टाटा उद्योगसमूहाचे ‘ताज लॅण्ड्स एण्ड’ हे प्रसिद्ध हॉटेल आधीपासून अस्तित्वात आहे. या हॉटेससमोरच नवे हॉटेल उभारले जाणार आहे. नव्या हॉटेलमध्ये ३३० खोल्या आणि ८५ अपार्टमेंट्स असतील. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मेळावे, परिषदांच्या आयोजनासाठी कन्व्हेन्शन हॉल आणि इतर जागतिक दर्जाच्या सुविधा असणार आहेत, अशी माहिती चटवाल यांनी दिली.
हॉटेल उभारणीसोबतच आजूबाजूच्या परिसराचा विकास आणि देखभाल करण्यात येणार असल्याचे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडकडून सांगण्यात आले आहे. यात लँडस्केप गार्डन, क्रीडा तसेच करमणुकीचे उपक्रम राबवण्यात येणार आहे.
‘ताज बॅण्डस्टॅण्ड’ हे आयएचसीएल कंपनीचे मुंबईतील १७वे हॉटेल्स होणार आहे. सध्या कंपनीची ५ हॉटेल्स विकसित होत आहेत. या हॉटेलच्या उभारणीसाठी सरकारी विभागांकडून महत्त्वाच्या मंजुरी मिळाल्या प्राप्त झाल्या असून याचवर्षी बांधकाम सुरू होणार आहे. पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे चटवाल यांनी सांगितले.
संबंधित बातम्या