Titan Share Price Today : टायटन कंपनीच्या पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी सकाळच्या व्यवहारात टायटन कंपनीचा भाव ७ टक्क्यांहून अधिक घसरला. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाचे पडसाद आज शेअर बाजारात (stock market) उमटले.
वास्तविक जून तिमाहीत टायटन कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. त्यामुळं कंपनीचा शेअर आज बीएसईवर ३२०१.०५ रुपयांवर उघडला. शुक्रवारी हा शेअर ३४६३.१५ वर बंद झाला होता. त्यात ७.५ टक्क्यांनी घट होऊन आज तो उघडला.
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत टायटनचा एकत्रित निव्वळ नफा ५.४२ टक्क्यांनी घटून ७१५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ७५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. नफा घटला असला तरी या आर्थिक वर्षाच्या जूनच्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री १२.६४ टक्क्यांनी वाढून १२,२२३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत निव्वळ विक्री १०,८५१ कोटी रुपये होती, असं टायटननं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
जून तिमाहीत टायटनचा एकूण खर्च १२.७५ टक्क्यांनी वाढून १२,४१३ कोटी रुपये झाला आहे. जून तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न ११.४४ टक्क्यांनी वाढून १३,३८६ कोटी रुपये झालं आहे. या तिमाहीत टायटनचा दागिन्यांच्या व्यवसायातून मिळणारा महसूल १०.४ टक्क्यांनी वाढून ११,८०८ कोटी रुपये झाला आहे.
टायटनचा ब्रँड 'तनिष्क'ने ओमानमधील मस्कतमध्ये नवीन शोरूम उघडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं अस्तित्व मजबूत केलं आहे. सध्या टायटनची भारताबाहेर १७ आउटलेट्स आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळं कोअर ज्वेलरी व्यवसायातील मागणीत अडथळा निर्माण झाला. परिणामी टायटन कंपनीच्या निव्वळ नफ्यातील वाढ मंदावली.
ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीच्या अंदाजानुसार, टायटनचा शेअर आणखी वाढू शकतो. मॅक्वेरीनं टायटनच्या शेअरवर ४,१०० रुपयांचं टार्गेट कायम ठेवलं आहे. जेपी मॉर्गननंही प्रति शेअर ३,४५० रुपयांचं टार्गेट ठेवत विचलित होणं टाळलं आहे. दुसरीकडं सिटीनं शेअरबाबत तटस्थ भूमिका कायम ठेवत टार्गेट प्राइस ३,५१० रुपये प्रति शेअर पर्यंत वाढवली आहे. गोल्डमन सॅक्सनं ३,७५० रुपयांच्या वाढीव उद्दिष्टासह शेअर खरेदी करण्याची आपली आधीची शिफारस कायम ठेवली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) टायटनचे १,९२,७६,८६१ समभाग आहेत.