सरकारच्या एका निर्णयाचा परिणाम! टाटा समूहातील 'या' कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल २० टक्क्यांची वाढ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सरकारच्या एका निर्णयाचा परिणाम! टाटा समूहातील 'या' कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल २० टक्क्यांची वाढ

सरकारच्या एका निर्णयाचा परिणाम! टाटा समूहातील 'या' कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल २० टक्क्यांची वाढ

HT Marathi Desk HT Marathi
Nov 26, 2024 04:10 PM IST

TTML Share Price : गुंतवणूकदारांमध्ये कायम चर्चा असलेला टाटा समूहातील टीटीएमएल हा शेअर आज चांगलाच उसळला. सरकारची एक घोषणा त्यासाठी कारणीभूत ठरली.

टाटा ग्रुप स्टॉक फोटो क्रेडिट न्यू इंडियन एक्सप्रेस
टाटा ग्रुप स्टॉक फोटो क्रेडिट न्यू इंडियन एक्सप्रेस

TTML share Price : टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडच्या शेअरमध्ये मंगळवारी मोठी वाढ झाली. टाटा समूहाचा शेअर आज इंट्राडे मध्ये २० टक्क्यांनी वधारला आणि ८२.८६ रुपयांवर पोहोचला. 

टीटीएमएलचा शेअर ६९.८६ रुपयांवर खुला झाला आणि इंट्रा डे व्यवहारात ८२.८६ रुपयांचा उच्चांक गाठला. यापूर्वी याची बंद किंमत ६९.०८ रुपये होती. सुरुवातीच्या व्यवहारात ४१,१३५,७४७ शेअर्सचे व्यवहार झाले आणि सुमारे ३१९ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. टीटीएमएलच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ६५.२९ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत १११.४० रुपये होती.

शेअर्स वाढण्याचे कारण

कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागे सरकारची घोषणा आहे. मोदी मंत्रिमंडळानं टेलिकॉम कंपनीच्या बँक गॅरंटी इश्यूला तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर टाटा समूहाची टेलिकॉम कंपनी टीटीएमएलच्या शेअर्समध्ये मंगळवारी बीएसईवर सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दिसून आली. मंत्रिमंडळानं स्पेक्ट्रम खरेदीची २०२२ पर्यंतची थकीत बँक गॅरंटी माफ करून टेलिकॉम कंपन्यांना दिलासा दिला आहे. दूरसंचार विभागानं स्पेक्ट्रम खरेदीसाठी टेलिकॉम ऑपरेटर्सची बँक गॅरंटी माफ करण्यास अनुकूलता दर्शविली होती.

याशिवाय, टीटीएमएलच्या शेअरच्या किमतीत वाढ होण्यास कारणीभूत ठरणारा एक प्राथमिक घटक म्हणजे टेलिकॉम क्षेत्रातील एकंदरीत सकारात्मक भावना. विशेषत: डिजिटल सेवांची मागणी वाढत असताना टेलिकॉम कंपन्यांच्या भविष्यातील वाढीच्या शक्यतांबद्दल गुंतवणूकदार अधिकाधिक आशावादी होत आहेत.

कशी आहे शेअरची वाटचाल?

कंपनीच्या शेअरमध्यं सातत्यानं घसरण पाहायला मिळत आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर १७ टक्क्यांनी घसरला आहे. तर, मागच्या वर्षभरात १२ टक्क्यांनी घट झाली आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या २ वर्षात मोठी घसरण झाली आहे. टीटीएमएलच्या शेअरमध्ये ११ जानेवारी २०२२ पासून ७२ टक्क्यांची घसरण झाली आहे. ११ जानेवारी २०२२ रोजी शेअरचा भाव २९१.०५ रुपये होता. मात्र, गेल्या पाच वर्षांत हा शेअर २६०० टक्क्यांहून अधिक वधारला असून २ रुपयांवरून सध्याच्या किमतीवर पोहोचला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. यातील तज्ज्ञांची मतं आणि शिफारशी व्यक्तिगत आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner