Tata Group Company Share Price : टाटा समूहाची किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपनी ट्रेंटनं आपल्या भागधारकांना दणदणीत परतावा दिला आहे. ट्रेंटच्या शेअरमध्ये गेल्या १० वर्षांत ५३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हाच हिशेब रुपयांत करायचा झाल्यास या शेअरनं गुंतवणूकदारांच्या १ लाखांचे तब्बल ५४ लाख केले आहेत.
दहा वर्षांच्या काळात ट्रेंटचा शेअर १३८ रुपयांवरून ७६०० रुपयांवर गेला आहे. ट्रेंटच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७,९३९ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १९४६.३५ रुपये आहे. दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांची टाटा समूहाच्या या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक आहे.
ट्रेंटचा शेअर १ ऑक्टोबर २०१४ रोजी १३८.५५ रुपयांवर होता. हाच शेअर १ ऑक्टोबर २०२४ रोजी ७६१२.३५ रुपयांवर बंद झाला आहे. ट्रेंटच्या शेअरनं या काळात गुंतवणूकदारांना ५३९४ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीनं १० वर्षांपूर्वी ट्रेंटच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल आणि ही गुंतवणूक आजही कायम ठेवलेली असेल, तर त्याच्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं एकूण मूल्य आज ५४.९३ लाख रुपये झालेलं असेल. ट्रेंटचं मार्केट कॅप २,७०,६०९.५० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
ट्रेंटच्या शेअर्समध्ये गेल्या ५ वर्षांत १४५० टक्के वाढ झाली आहे. टाटा समूहाच्या या कंपनीचा शेअर ४ ऑक्टोबर २०१९ रोजी ४९०.४५ रुपयांवर होता. तो १ ऑक्टोबर २०२४ रोजी ७६१२.३५ रुपयांवर बंद झाला. गेल्या दोन वर्षांत ट्रेंटचा शेअर ४३७ टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या वर्षभरात ट्रेंटचे शेअर्स २७० टक्क्यांनी वधारले आहेत. तर कंपनीच्या शेअर्समध्ये यंदा १५३ टक्के वाढ झाली आहे.
दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी डेरिव ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या गुंतवणूक फर्मच्या माध्यमातून ट्रेंटमध्ये गुंतवणूक केली आहे. राधाकिशन दमानी यांच्याकडं ट्रेंटचे ४५,०७,४०७ शेअर्स म्हणजेच १.२७ टक्के शेअर्स आहेत. ट्रेंटमधील शेअरहोल्डिंगची ही आकडेवारी जून २०२४ तिमाहीपर्यंतची आहे.