Share Market : मागच्या वर्षभरात मालामाल करणारा टाटा ग्रुपचा हा शेअर नव्या वर्षात रोज देतोय धक्का! आजही दणकून आपटला!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Market : मागच्या वर्षभरात मालामाल करणारा टाटा ग्रुपचा हा शेअर नव्या वर्षात रोज देतोय धक्का! आजही दणकून आपटला!

Share Market : मागच्या वर्षभरात मालामाल करणारा टाटा ग्रुपचा हा शेअर नव्या वर्षात रोज देतोय धक्का! आजही दणकून आपटला!

Jan 21, 2025 02:58 PM IST

Trent Share Price : टाटा समूहातील सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ट्रेंट लिमिटेडचा शेअर मंगळवारी ५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला.

मागच्या वर्षभरात मालामाल करणारा टाटा ग्रुपचा हा शेअर नव्या वर्षात रोज देतोय धक्का! आजही दणकून आपटला!
मागच्या वर्षभरात मालामाल करणारा टाटा ग्रुपचा हा शेअर नव्या वर्षात रोज देतोय धक्का! आजही दणकून आपटला!

Stock Market News Today : मागच्या वर्षभरात गुंतवणूकदारांना मालामाल करणारा टाटा समूहातील ट्रेंट लिमिटेड कंपनीचा शेअर नव्या वर्षात नकारात्मक वाटचाल करत आहे. या वर्षी जानेवारीतील आतापर्यंतच्या १५ ट्रेडिंग सेशन्समध्ये हा शेअर जवळपास १८ टक्क्यांनी घसरला आहे. आजही हा शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरला आणि ५७८२ रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. 

ट्रेंट लिमिटेडच्या शेअरनं जानेवारी महिन्यात निफ्टी ५० निर्देशांकावर आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी केली आहे. तर, गेल्या वर्षी २०२४ मध्ये शेअरची कामगिरी जोरदार होती. २०२४ मध्ये निफ्टी ५० निर्देशांकात ट्रेंट १३३ टक्क्यांहून अधिक वाढीसह सर्वोत्तम कामगिरी करणारा शेअर होता. बदललेल्या परिस्थितीत ब्रोकरेज फर्मनं शेअर विक्रीचा सल्ला दिला असून टार्गेट प्राइस कमी केलं आहे. ट्रेंटनं गेल्या वर्षभरात ८३ टक्के आणि पाच वर्षांत जवळपास ९०० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

ट्रेंटचा शेअर ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये

आजच्या घसरणीमुळं ट्रेंटचे शेअर्स त्यांच्या २०० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या (DMA) खाली घसरले आहेत. त्याचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सही (RSI) २७ पर्यंत घसरला आहे, म्हणजेच हा शेअर आता 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये आहे. आरएसआय ३० च्या खाली असणं म्हणजे स्टॉक 'ओव्हरसोल्ड'मध्ये आहे. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबर रोजी हा शेअर ८,३४५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होता. तिथपासून आता तो जवळपास ३१ टक्क्यांनी घसरला आहे.

एक्सपर्ट्सना अजूनही भरवसा

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं गेल्या आठवड्यात ट्रेंट संदर्भात काही मतं मांडली होती. 'ट्रेंटच्या शेअरच्या किमतीत झालेल्या जबरदस्त वाढीनंतर नफा बुक करण्याची वेळ आली आहे. ब्रोकरेज कंपनीनं या शेअरला आधीच्या 'अ‍ॅड' रेटिंगवरून 'सेल' रेटिंगवर आणलं आहे. कोटकचं सुधारित उद्दिष्ट मूल्य ५,८५० रुपयांच्या खाली हा शेअर व्यवहार करत आहे. मात्र, ट्रेंट आर्थिक वर्ष २०२५ ते २०२७ दरम्यान महसूल आणि ईपीएस कंपाऊंड वार्षिक विकास दर (CAGR) अनुक्रमे २९ टक्के आणि ३५ टक्के नोंदवेल, अशी अपेक्षा कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजला आहे. ट्रेंटचा अभ्यास करणाऱ्या २२ विश्लेषकांपैकी १२ विश्लेषकांनी 'बाय' रेटिंग दिलं आहे, तर प्रत्येकी पाच विश्लेषकांनी अनुक्रमे 'होल्ड' आणि 'सेल' रेटिंग दिलं आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner