Stock Market Updates : टाटा समूहाची ज्वेलरी आणि वॉचमेकिंग कंपनी टायटनचे शेअर्स बुधवारी ट्रेडिंगदरम्यान चर्चेत होते. कंपनीचा शेअर आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात ३ टक्क्यांहून अधिक घसरून ३११३.६५ रुपयांवर पोहोचला. याआधी मंगळवारी हा शेअर ३२३३.०५ रुपयांवर बंद झाला होता. शेअर्समधील ही घसरण सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर दिसून आली आहे. सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफा २३ टक्क्यांनी घसरून ७०४ कोटी रुपयांवर आला आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत टायटनचा एकत्रित निव्वळ नफा २३ टक्क्यांनी घसरून ७०४ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला ९१६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. मात्र, या तिमाहीत कंपनीची विक्री २५.८२ टक्क्यांनी वाढून १३,४७३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १०,७०८ कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत टायटनचे एकूण उत्पन्न १५.८३ टक्क्यांनी वाढून १४,६५६ कोटी रुपये झाले आहे. या तिमाहीत टायटनचा दागिन्यांचा व्यवसाय १५.२५ टक्क्यांनी वाढून १२,७७१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
टाटा समूहाच्या टायटन कंपनीवर लक्ष ठेवून असलेल्या बहुतेक विश्लेषकांनी सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शेअरवरील त्यांच्या टार्गेट किमतींमध्ये कपात केली आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजने शेअरवरील आपले 'होल्ड' रेटिंग कायम ठेवले आहे, परंतु आपले टार्गेट प्राइस ३६०० रुपयांवरून ३४०० रुपयांवर आणले आहे.
जेफरीजने २०२५-२०२७ या आर्थिक वर्षासाठी टायटनचे प्रति शेअर उत्पन्न ३ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. गोल्डमन सॅक्सने टायटनवर आपली 'बाय' शिफारस कायम ठेवली आहे आणि आपली टार्गेट प्राइस ३,७५० रुपयांवरून ३,६५० रुपयांवर आणली आहे.
मॉर्गन स्टॅनलीने शेअरवरील आपले रेटिंग कायम ठेवले आहे आणि टार्गेट प्राइस ३५७६ रुपयांवरून ३५३२ रुपयांवर आणली आहे. दुसरीकडे, सीएलएसएने टायटनवरील आपले टार्गेट प्राइस ३९४८ रुपयांवरून ४२२१ रुपयांपर्यंत वाढवले आहे.
मॅक्वेरीने ४,००० रुपयांच्या किमतीचे उद्दिष्ट ठेवून शेअरवर आपले 'आउटपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवले आहे. टायटनवर लक्ष ठेवून असलेल्या ३४ विश्लेषकांपैकी १७ विश्लेषकांनी 'बाय' रेटिंग दिले आहे, १२ विश्लेषकांनी 'होल्ड' म्हटले आहे, तर पाच विश्लेषकांनी विक्रीची शिफारस केली आहे.