tata group stock : टाटाचा हा शेअर मिळवून देऊ शकतो बक्कळ पैसा! तब्बल २० तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  tata group stock : टाटाचा हा शेअर मिळवून देऊ शकतो बक्कळ पैसा! तब्बल २० तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

tata group stock : टाटाचा हा शेअर मिळवून देऊ शकतो बक्कळ पैसा! तब्बल २० तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Jun 25, 2024 03:56 PM IST

Tata group stock : टाटा समूहातील प्रतिष्ठित कंपनी असलेल्या टायटनचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला मार्केट एक्सपर्ट्सनी दिला आहे.

टाटाचा हा शेअर मिळवून देऊ शकतो बक्कळ पैसा! तब्बल २० तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
टाटाचा हा शेअर मिळवून देऊ शकतो बक्कळ पैसा! तब्बल २० तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Tital Share Price : टाटा समूहातील अत्यंत महत्त्वाची कंपनी असलेल्या टायटन कंपनीचा शेअर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यंदा कंपनीनं तिमाही निकालांसोबतच एका शेअरमागे ११ रुपयांचा लाभांश घोषित केला आहे. जून २७ ही लाभांशाची रेकॉर्ड डेट आहे. त्यामुळं लाभांश पदरात पाडून घेण्यासाठी आता अवघा एकच दिवस उरला आहे. टायटनवर लक्ष ठेवून असलेल्या ३२ विश्लेषकांपैकी २० जणांनी खरेदीचा सल्ला दिला आहे.

टायटन हा दिग्गज गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांचा फेवरिट स्टॉक होता. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हाच स्टॉक प्रमुख होता. आता रेखा राकेश झुनझुनवाला हा पोर्टफोलिओ पाहतात. मार्चच्या अखेरीस टायटनमध्ये झुनझुनवाला यांची गुंतवणूक ५.३५ टक्के होती. सध्याच्या बाजाराभावानुसार या गुंतवणुकीचं मूल्य १६,१४४ कोटी रुपये होतं.

टायटन हा प्रतिष्ठित शेअर असला तरी यंदाच्या जानेवारी महिन्यापासूनच हा शेअर सातत्यानं घसरत आहे. मागच्या सहा महिन्यात हा शेअर आतापर्यंत ७ टक्क्यांहून जास्त घसरला आहे. आजही ही घसरण सुरूच राहिली. आज टायटनचा शेअर ०.२२ टक्क्यांनी घसरून ३४०४.७० रुपयांवर ट्रेड करत आहे.

डिविडंड घोषित होऊनही उठाव नाही!

टायटन कंपनीनं तब्बल १३ वर्षांनंतर यावेळी जास्त लाभांश जाहीर केला आहे. २०१० साली कंपनीनं एका शेअरमागे १५ रुपये लाभांश जाहीर केला होता. त्यानंतर आता ११ रुपये देण्यात आले आहेत. मात्र, लाभांश जाहीर झाल्यानंतरही शेअरमध्ये वाढ दिसत नसल्याचं चित्र आहे.

टायटनच्या अंतिम लाभांशाची रेकॉर्ड डेट २७ जून निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी २६ जून किंवा त्यापूर्वी टायटनचे शेअर्स खरेदी केले आहेत, ते लाभांश देण्यास पात्र असतील.

बोनस आणि स्प्लिट

शेअरच्या किंमतीतील वाढ, लाभांशाबरोबरच टायटन कंपनीनं वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. २०१० नंतर कंपनीनं १:१ या प्रमाणात बोनस शेअर्सही जारी केले आणि १० रुपयांच्या एका शेअरची प्रत्येकी १ रुपयांच्या दहा शेअर्समध्ये विभागणी करून आपल्या शेअरची विभागणी केली.

…तर २०१६ नंतर पहिल्यांदाच नकारात्मक परतावा

जून महिन्यात आतापर्यंत या शेअरमध्ये अगदी नगण्य वाढ झाली आहे. तर, मे महिन्यात हा शेअर १० टक्क्यांनी आणि एप्रिलमध्ये ५.५ टक्क्यांनी घसरला होता. २०२४ मध्ये हा शेअर अजूनही ७.३ टक्क्यांनी घसरला आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत हा तोटा भरून काढण्यात यश न आल्यास २०१६ नंतर टायटनचा हा पहिलाच नकारात्मक परतावा ठरू शकतो. असं असूनही टायटनवर लक्ष ठेवून असलेल्या ३२ विश्लेषकांपैकी २० विश्लेषकांनी खरेदीचा, तर इतर आठ जणांनी 'होल्ड' करण्याचा सल्ला दिला आहे. अवघ्या ४ जणांनी विक्रीची शिफारस केली आहे.

 

(डिस्क्लेमर: वरील वृत्त हे केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner